'रॅप्टरलँड'ची अद्भुत सफर



ब्लॅक विंग्ड काईट (कापशी)
गेल्या वर्षाच्या तुलनेत पुण्यात यंदा हिवाळ्यानं चांगलंच गारठवलंय. रामप्रहरी कुठल्याही रस्त्यावरून जा, स्वेटर, मफलर आणि डोक्याला माकडटोप्या गुंडाळलेली मंडळी 'मॉर्निंग वॉक' करताना दिसून येतात. थंडीची चाहूल लागल्या दिवसापासूनच पक्षीप्रेमी मंडळी आपापली आयुधं, म्हणजे कॅमेरे, लेन्सेस आणि ट्रायपॉड वगैरे सज्ज ठेवतात. त्यांना वेध असतात, ते थंडीत आपल्या भागात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची. त्यासाठी भिगवणमधील उजनी बॅकवॉटर, वीर धरण आदी ठिकाणी जायचे प्लॅन्स आखण्यात येतात. हे झालं फ्लेमिंगो (रोहित किंवा अग्निपंख), बार हेडेड गूझ (पट्टकादंब), डेमोसाईल क्रेन आदी मोठ्या पक्ष्यांबाबत. छोट्या पक्ष्यांसाठी सिंहगड व्हॅली, मुळशी, पानशेत अशा ठिकाणी पक्षीप्रेमी गर्दी करतात.

हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत पांघरुणातून बाहेर पडण्याची खरं तर इच्छा होत नाही. पण पाहुण्या पक्ष्यांसह स्थानिकांनाही भेटण्याची ओढ अनिवार असल्यानं, पांघरूण झटकून मी तयारीला लागलो. तयार होत असतानाच मोबाईल खणखणला. पलिकडून आमच्या ग्रुपमधले एक मित्र विचारत होते, 'झालात का तयार?' माझी तयारी आटपत आलीच होती. त्यांना बाणेदारपणे 'निघतोच पाच मिनिटांत', असं उत्तर देऊन मी माझी आयुधं तपासू लागलो. काही विसरलं, तर ऐनवेळी पंचाईत नको म्हणून दोन दोनदा तपासणी केली आणि निघालो.

रूफस टेल्ड स्पॅरो लार्क (मुरारी)
ठीक सहा वाजता आम्ही पु्ण्यातून निघालो. या वेळी मार्ग थोडा वेगळा निवडला होता. आमचं हे 'एक्स्प्लोरिंग क्रूझ' असणार होतं. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही सिंहगड व्हॅली हे नेहमीचंच ठिकाण वगळून सिंहगडाच्या परिसरात भरपूर भटकलो. या भटकंतीचा आम्हाला चांगला फायदाही झाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात आम्ही राजगडाचा परिसर पालथा घातला. नेहमी एकाच ठिकाणी तुम्ही गेलात, तर त्याचं नाविन्य फारसं राहात नाही. शिवाय तोच तो पणाचा कंटाळा येतो. सिंहगड व्हॅली उत्कृष्ट आहे, यात वादच नाही. पण तिथंही ठरलेली मंडळी भेट देतात. नाविन्याचा शोध घेण्यासाठी नव्या ठिकाणी जाणं केव्हाही उत्तम. आम्ही तेच ठरवलं होतं. दरवेळी नवी ठिकाणं शोधायची. नवीन काही गवसतं का त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच आम्ही निघालो होतो लोणावळा परिसरात. आम्ही तिथं कधीच गेलो नव्हतो आणि कोणी गेल्याचं ऐकलंही नव्हतं.

गूगल मॅपवरून त्या ठिकाणाची माहिती घेतली होती. तासाभरात आम्ही त्या जादुई प्रदेशात प्रवेश करते झालो. या नव्या प्रदेशाचं स्कॅनिंग करण्यापूर्वी पोटात चहाची बेगमी करून चेहऱ्यावर ताजेतवानापणा आणला आणि आता इथं काय काय दिसेल, याचा अंदाज बांधत पुढं निघालो. या प्रदेशात पुढं दिसली, ती सर्व आदिवासी पाडे होते. चहा घेतानाच हॉटेल चालकानं तशी माहिती दिली होती. आदिवासी पाडे म्हणजे आमच्या दृष्टीनं पर्वणीच होती. इथलं जंगल 'इन्टॅक्ट' असेल, अशी मनोमन प्रार्थना केली. दिवसाची सुरवात करून दिली ती 'स्टोनचॅट'नं. त्यापाठोपाठ 'अॅशि हेडेड स्पॅरो लार्क'च्या जोडप्यानंही दर्शन दिलं. मुळशी तालुक्यातल्या एका धरणाला त्याच्या बॅकवॉटरसह प्रदक्षिणा घालण्याचा आमचा मनसुबा होता. धरणाचं बॅकवॉटर किलोमीटरगणती पसरलेलं असतं. त्याला वळसा म्हणजे खूपच लांबचा फेरफटका होणार होता. पहिली दोन-चार गावं गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आदिवासी भाग सुरू झाला.

रस्त्यावरची वाहतूक आता लक्षणीयरित्या मंदावली होती. अधून मधून मोटरसायकलस्वारांची जा-ये चालू होती
इंडियन रोलर (नीलपंखी)
एवढंच. आता आम्ही बॅकवॉटरच्या एका शाखेच्या टोकावर आलो. दूरवर नजर फेकली तेव्हा किनाऱ्यावर अनेक पक्षी असल्याचं दिसलं. आम्ही आपली आयुधं घेऊन दूरवर दिसणाऱ्या त्या पक्ष्यांमधलं अंतर कमी करू लागलो. डोंगराळ भागातील चढ-उतारांशी सामना करत आम्ही साधारणपणे अर्ध्या किलोमीटरवर जाऊन कॅमेऱ्यातून पाहिलं आणि आमची घोर निराशा झाली. पांढऱ्या रंगाचे ते पक्षी नव्हते, तर किनाऱ्यावरील दगडांवर पाणपक्ष्यांनी केलेल्या 'शी'मुळं सर्वच दगड पांढरे झाले होते. माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जाताना एक 'रूफस टेल्ड लार्क' मिळाला, दुधाची तहान ताकावर भागवून पुढं निघालो.

एक सफाईदार वळण वळण घेऊन आसमंत न्याहाळत आम्ही जात असतानाच अचानक डाव्या बाजूच्या टेकडीच्या पायथ्याच्या झुडुपातून एक शिक्रा उडाला. थांबणं क्रमप्राप्तच होतं. आम्ही चौघांनी गाडीतून उडी मारली आणि शिक्रा बसलेलं झुडुप नजरेआड न करता सावधपणे पुढं सरकू लागलो. तेवढ्यात तो उडाला आणि डोंगराच्या एका घळीत जाऊन बसला. घळीतली त्याची बसण्याची जागा लक्षात ठेवून नजर न हटवता मी हळूहळू टेकडी चढू लागलो. आपण कितीही सावध राहिलो, तरी पक्षी आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं सावध असतात. तो उडाला आणि टेकडीच्या दुसऱ्या भागात गेला. मी त्याच्या पाठोपाठ होतोच. तो एका लहानशा झाडाच्या फांदीवर बसला होता. होतो तिथूनच त्याची छायाचित्रं घेतली आणि पुन्हा सावधगिरीनं चाल केली. तेवढ्यात तो उडाला आणि माझ्या मागून मोठ्या डौलात बोनेलीज ईगलनं नाराच) दर्शन दिलं. पहिल्याच फटक्यात दोन रॅप्टर दिसल्यानं आमचा उत्साह वाढला होता.

बोनेलीज ईगल (नाराच)
धरणाचं पाणी कायम आमच्या उजव्या हाताला होतं. सूर्याची दिशाही योग्य असल्यामुळे जलाशयातील हालचाल दिसत होती. तिथं कूट (चांदवा किंवा वारकरी) आणि स्पॉटबिल डक (प्लवर) तरंगत होते. काही कूट मासेमारी करण्यात मग्न होते. आम्ही पाहात असतानाच स्पॉटबिलचा एक थवा उडाला आणि दुसरीकडे जाऊन बसला. उतरताना ते पाण्यावर छान स्केटिंग करत असतात. त्यांची काही छायाचित्रं घेऊन आम्ही पुढच्या अज्ञात मुक्कामाकडे निघालो. अज्ञात अशासाठी, की आम्ही कुठं थांबणार हे आम्हालाच माहित नव्हतं. पण एके ठिकाणी रस्ता थोडा खराब असल्यानं आम्ही हळूहळू जात होतो आणि तेवढ्यात एक शॉर्ट टोड ईगल (सर्पमार गरूड) शानदारपणे गरम हवेच्या झोतावर तरंगत वर जात होता. आम्ही जिथं थांबलो होतो, तिथून तो अगदीच जवळ होता. आम्ही फटाफट त्याचे फोटो घेतले. हा तिसरा रॅप्टर होता. दुपारच्या पोटपूजेसाठी आम्ही एका ओढ्याच्या पुलाजवळ बसलो. यथेच्छ पोटपूजा झाल्यानंतर थांबलो ते एकाला ब्लॅक विंग्ड काईट (कापशी) दिसल्यामुळे. त्याची छायाचित्रं घेत असतानाच एका चेंजेबल हॉक ईगलनं (व्याध किंवा मोरघार) त्याच्यावरच झेप घेतली. त्याला येताना कापशीनं पाहिलं असावं, कारण तो दिसल्याबरोबर त्यानं उड्डाण केलं आणि जीव घेऊन धूम ठोकली. कापशीचे उडतानाचं चित्र मिळालं पण त्या गरुडानं हुलकावणी दिली. एका गावाजवळ आम्हाला आणखी तीन गरूड दिसले. ते चेंजेबल हॉक ईगल होते. आणखी एका ओढ्याच्या ठिकाणी काही लहान-मोठे पक्षी मिळाले.

सूर्य अस्ताचलाकडे निघाला होता. आम्हालाही तो दुसऱ्या गोलार्धात जाईपर्यंत जमतील तितके पक्षी मिळवायचे होते. आणि ते पुन्हा दिसले. आधी तीन आणि त्यांच्यापाठोपाठ आणखी तीन, असे सहा चेंजेबल हॉक ईगल कदाचित आपल्या घरट्याकडे परतत होते. एक केस्ट्रेलही (खरूची) दिसला. आम्ही ज्या भागात होतो, तिथं झाडांची दाटी होती. हे सर्व पक्षीगणही काहीसे उंचावर होते. केवळ त्यांना पाहूनच आम्ही समाधान मानले. सूर्यदेव अंतर्धान पावण्याच्या बेतातच होते. या डोंगराळ प्रदेशात अंधार अचानक पडतो. त्या दिवसभरात आम्ही एकूण १६ शिकारी पक्ष्यांची नोंद केली. एकाच प्रदेशात इतके शिकारी पक्षी हा आमच्यासाठी आश्र्चर्याचा धक्का होता. प्रचंड मोठा जलाशय, शेती, माळरानं आणि डोंगरांचे ताशीव कडे, ही सर्व परिस्थिती त्यांना घरटी करण्यासाठी आणि शिकारीसाठी आदर्श आहेत. पुढच्यावेळी त्यांच्या जमल्यास त्यांच्या निवासाची ठिकाणं शोधून काढण्याचा उपदव्याप करण्याचं आम्ही ठरवलं आणि तृप्त मनानं पुण्याच्या दिशेनं निघालो.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

विहंगभूमी नैनिताल

अशाच एका 'रम्य' सकाळी...