माळरानातील किलबिलाट

सायबेरियन स्टोनचॅट (सायबेरियन गप्पीदास)
भटक्यांच्या आयुष्यात कधी कधी अनाहूतपणे बैठं जीवन येतंच. अनपेक्षितपणे पडलेला कामाचा अतिरिक्त भार किंवा आजारपण अशी कारणं त्यामागं असू शकतात. सलग पंधरा-वीस दिवस डांबून घेतल्यासारखं खुर्चीला खिळून राहण्यासारखी दुसरी शिक्षा नसावी. किमान भटक्यांच्या दृष्टीनं. तसं नोकरीचं जोखड मी भिरकटून टाकलं होतं. याचा अर्थ माझा बाणेदारपणा नव्हता, तर मी नियमानुसार निवृत्त झालो होतो. आता मी ज्येष्ठ नागरिक या "कॅटॅगरी'त असलो, तरी माझ्या भटक्या वर्तुळात सगळी तरणीबांड मुलंच होती. उगाच वासरात लंगड्या गाईसारखा मी त्यांच्या कळपात सामील झालो होतो. अर्थात ते मला त्यांच्यापेक्षा वेगळं समजत नव्हते, माझ्या आणि त्यांच्या विचारात नसले, तरी आवडी-निवडीत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी निसर्गवेडा. हातात "छायाचित्रक' म्हणजेच कॅमेरा घेऊन पक्ष्यांच्या, वन्य प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या मागं धावणारा मी कुठं आणि सदासर्वदा पोरींच्या विषयात गुंतलेले हे तरुण मित्र कुठं! माझं वय नजरेआड करून त्यांनी मला आपलं मानलं म्हणूनच मीही त्यांच्या "तसल्या' गप्पांत भान विसरून सहभागी होतो. असो.

पॅडीफील्ड पिपिट (तिरचिमणी)
अलिकडच्याच वर्षा-दोन वर्षांत मी माझ्या पठडीतल्या आणि माझ्या आगे-मागे वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कंपूत दाखल झालो. त्याची सुरवात झाली ती पुण्याजवळच्या कवडीपाट नावाच्या तथाकथित पक्षी अभयारण्यात. सोलापूर रस्त्यावरील मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे छोटंसं सुस्त गाव. गावाजवळून वाहणाऱया नदीवर एक छोटासा बांध आहे. या बांधामुळं तिथं कायम पाणी असतं. पुण्यामधून येणाऱ्या या नद्यांचं पाणी कसं असेल याचा अंदाज कोणीही बांधू शकतं. बांधामुळं अडलेलं गलिच्छ पाणी आणि या पाण्याच्या आश्रयावर वावरणारे स्थानिक आणि पाहुणे पक्षी पाहण्यासाठी हिवाळ्यात इथं नेहमीच गर्दी असते. शनिवार-रविवारी तर अक्षरशः जत्राच भरते. एखाद्या टप्प्यात आलेल्या पक्ष्यावर छायाचित्रकातून नेम धरावा, तर हमखास एखाद-दुसरा माणूस आडवा येईल इतकी गर्दी. अतिशयोक्तीचा भाग वगळला, तर इथं यावं तर हे दोन दिवस वगळूनच.

अशाच एका वगळलेल्या दिवशी मी एकटाच कवडीपाटला पोचलो. चौफेर नजर टाकून एकंदरीत अंदाज घेतला आणि माझं छायाचित्रक सज्ज करून हेरलेल्या एका मोक्याच्या ठिकाणी जाऊ लागलो. नदी किनारा खडकाळ आणि उंचसखल असल्यानं खाली बघून जात असतानाच "नमस्कार' अशी हाक ऐकू आली. चमकूनच मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. एक ज्येष्ठ नागरिक कॅटॅगरीत बसतील असे गृहस्थानंच अभिवादन केलं होतं. त्यांनी मला पाहिलं होतं "फेसबुक'वर! धन्य ते "फेसबुक'! आमच्या क्षेत्रातील जी काही थोडी-फार मंडळी आहेत, ती या "फेसबुक'मुळंच एकत्र येऊ शकली. या प्रसंगानंतर आमची मैत्री घट्ट झाली. हे व्यक्तिमत्त्व अतिशय बोलकं असल्यानं ही मैत्री आमच्यापुरतीच मर्यादित न राहता, आमच्याच जातकुळीतले आणखी दहा-बारा जण आमच्या कंपूत सामील झाले.

ब्लॅक विंग्ड काईट (कापशी)
त्यानंतर काय घडलं याची चित्तरकथा सांगत बसलो, तर भरकटल्यासारखं वाटेल म्हणून मूळ पदावर येतो. घरबशाचे पंधरा-वीस दिवस कसे काढले, ते माझं मलाच माहित. आता या स्थितीचं संक्रमण झालंच पाहिजे, म्हणून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला आम्ही चौघेजण आपापल्या सरंजामासह मोहिमेवर कूच करते झालो. आमचं उद्दिष्ट होतं सुप्याजवळचं मयुरेश्र्वर अभयारण्य गाठण्याचं. दुष्काळी, टेकड्यांचा आणि मुरमाड भागात सुमारे साडेचार चौरस किलोमीटरचं मयुरेश्र्वर अभयारण्य काटवनात मोडतं. माळावरचे पक्षी इथं हमखास सापडतात. हाताशी वेळ होता, म्हणून लगे हाथ पुरंदरावरही स्वारी करून आलो. तिथं आता लष्करानं ठाण मांडल्यानं मनात येईल तेव्हा गडावर जाता येत नाही. दिवसभर मयुरेश्र्वर आणि पुरंदर किल्ल्यावर घालवल्यानंतर पंधरा-वीस दिवसांचा ताण जाऊन शरीर कसं ताजं तवानं झालं. त्यानंतर लगेच कोंडणपूर-सिंहगडची चक्कर झाली.

लांब शेपटीचा खाटीक
पुण्यातल्या पक्षीमित्रांमध्ये सिंहगड व्हॅलीचं मोठं आकर्षण. इथंही सर्व वयोगटातले नवीन मित्र मिळाले. तर सांगायचा मुद्दा हा, की व्हॅलीत येण्याआधी आम्ही परिसरातच मनसोक्त भटकलो. सिंहगड परिसर झाड-झाडोऱ्यानं भरलेलं असलं, तरी परिसर मात्र रुक्ष म्हणावा असाच आहे. रखरखीत वाळलेलं गवताळ माळरान, मुरुम आणि खडकाळ छोट्या-मोठ्या टेकड्यांनी हा प्रदेश एखाद्या मरुभूमीहून कमी नाही. पण इथं विहंगांची बरीच हालचाल असते. दाट झाडीत छायाचित्रकातून पक्ष्यांचा वेध घेणं जितकं अवघड, तितकंच या माळरानावर सोपं. उन्हाची तमा न बाळगता एका जागी बसून राहिलं, तर पक्षीच तुमच्या जवळ येतात. सायबेरियन स्टोनचॅट (सायबेरियन गप्पीदास), पाईड बुशचॅट (गप्पीदास), बार्न स्वॅलो (माळ भिंगरी), व्हाईट ब्राऊड वॅगटेल (पांढऱ्या भुवईचा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी), यलो वॅगटेल (पिवळा धोबी), ग्रे हेडेड बंटिंग (करड्या मानेचा भारीट), रुफस टेल्ड लार्क (मुरारी), इंडियन कोर्सर (धाविक), चेस्टनट शोल्डर्ड सँडग्रूज (पखुर्डी), रेड कॉलर्ड डव्ह (तांबी होला), ओरिएंटल स्कायलार्क (गवई चंडोल), लाँग टेल्ड श्राईक (लांब शेपटीचा खाटीक), सदर्न ग्रे श्राईक (राखी खाटीक) आदी मंडळी हमखास आढळतात.

इंडियन रॉबिन (दयाळ) (मादी)
बराच वेळ आम्ही या वैराण भासणाऱ्या पण पक्ष्यांच्या किलबिलाटांनी भारलेल्या ओसाड भूमीत भान विसरून चित्र टिपत होतो. उन्हानं पाठ भाजून निघाल्यावर पुढं निघालो. गाडीत बसतानाच एक गावकरी खांद्यावर झाडाचं लांबलचक खोड घेऊन आला आणि आम्हाला पाहून "वाईच तंबाखू खायला' विसावला. पुढं जाणारा रस्ता कच्चा आणि मुरमाड होता. सपाटीचं ठीक आहे, पण समोरच्या उंच टेकडीवर चढताना तिची दमछाक होईल का, ही शंका मनात होतीच. गाडी जाण्याची शक्यता या गावकऱ्यानं उडवून लावली. तरी तसल्या रस्त्यावरून मी कैक वेळा गाडी घातलेली असल्यामुळं नेटानं निघालो. अगदीच अशक्य असलं, तर हातातलं चक्र उलटं फिरवायचं, आहे काय आन् नाही काय. घातली झालं गाडी. हे धाडस अंति अंगलट येण्याऐवजी अत्यंत लाभदायक ठरलं. कसं ते पाहा.

खालच्या मरूभूमीत आणि टेकडी या दोन्हीच्या रुक्षपणात काहीच फरक नव्हता. मातीच्या रस्त्यावरून दगड-धोंडे शिताफीनं चुकवत आम्ही माथ्यावर पोचलो, माथ्यावरच्या एका छोट्या खिंडीतून पुढं उतार होता. खिंडीत सावली होती आणि वातानुकूलन यंत्रातून येतो तशी पण नैसर्गिक थंड वाऱ्याच्या झुळका येत होत्या. इथं थांबणं म्हणजे खऱ्या अर्थानं विसावणं होतं. गाडीतून खाली उतरताना सवयीनुसार आकाशाकडे नजर गेली आणि वर कॉमन केस्ट्रेल (खरुची) हा शिकारी पक्षी घिरट्या घालताना दिसला. ही तर पर्वणीच होती. उडणाऱ्या खरुचीची अनेक छायाचित्रं आम्ही टिपली पण समाधान नव्हतं. तो खाली येण्याचं चिन्ह नसल्यानं आम्ही पुढं निघालो. उतार संपण्यापूर्वीच आमच्यापुढं संकट उभं राहिलं. आधीच्या पावसाळ्यात खालचा निम्मा रस्ताच वाहून गेला होता. हा रस्ता दुरुस्त करण्याची कोणालाच निकड नसावी असं दिसत होतं. आमचा मार्ग इथंच खुंटला आणि आम्ही परत फिरलो.

कॉमन केस्ट्रेल (खरुची)
खरुची पुन्हा दर्शन देईल या आशेनं आम्ही पुन्हा टेकडीवरच्या खिंडीत थांबलो आणि आमची आशा फलद्रूप झाली. खरूची दिसला. एकटा नाही तर जोडीनं. घिरट्या घालता घालता नर बराच खाली आला. आता समोरच्या खडकावर त्यानं आमच्यासारखंच काही काळ विसावा घ्यावा, आम्हाला अपेक्षित खडकावर थेट सूर्यप्रकाश येत असल्यानं, त्याची छान छायाचित्र मिळतील, असं आम्ही एकमेकांना बोलून दाखवत होतो आणि अहो आश्र्चर्यंम्! जणू आमची विच्छा पुरी करण्यासाठी तो तीरासारखा खाली आला आणि आमच्या डोक्यावरून आमच्या मागच्या टेकडीवरील खडकावर जाऊन बसला. सावधपणे रेकॉर्ड शॉट घेत घेत आम्ही इंच इंच पुढं जात होतो. तसा तो बराच धीट होता. त्याच्यापासून साधारण दोनशे फुटांवर आम्ही पोचलो तरी तो आरामात बसला होता. मनसोक्त छायाचित्रं काढून झाल्यानंतर तो उडून दूर जाऊन बसला. आमची कामगिरी आणि केलेलं धाडस यशस्वी झालं होतं!

Comments

  1. अरविंद तेलकर ...
    छायाचित्रकलेइतकीच लेखणीही तुम्हाला वश आहे. छान लिहीत रहा.
    - सुभाष नाईक, पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुभाषजी...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

विहंगभूमी नैनिताल

अशाच एका 'रम्य' सकाळी...