निसर्गरम्य राजगड परिसर


इंडियन रोलर (नीलपंख)
राजगड परिसरातील ओढ्याच्या पुलावर आम्ही चौघंजण डोळ्यांना कॅमेरे लावून डोळे ताणून पाहात होतो. येणारे जाणारे कुतूहलानं पाहात होते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांतूनही लोक एकदा आमच्याकडे पाहात आणि नंतर आमच्या कॅमेऱ्यांचा रोख असलेल्या जागी पाहात आणि निघून जात. त्यांना काही दिसणं शक्यच नव्हतं. काय वेडी माणसं आहेत, असा चेहरा करत ते आपल्या उद्दिष्टमार्गाकडे डोळे लावून पुढं निघून जात. आम्ही मात्र एका लाँग टेल्ड श्राईकची (लांब शेपटीचा खाटीक) धांदल पाहण्यात गुंग झालो होतो. या खाटकानं चोचीत छोटा सरडासदृश काही पकडलं होतं आणि ओढ्याकाठच्या उंबराच्या झाडावर पानांच्या भाऊगर्दीत दिसेनासा झाला होता. तो काही काळ तरी बाहेर येईल, याची आम्ही वाट पाहात होतो. मात्र त्या पठ्ठ्यानं चोचीतल्या भक्ष्यासह काही आम्हाला दर्शन दिलंच नाही.

भाविकांना जसं कुंभ मेळ्याचं आकर्षण, तसंच आम्हा काही मंडळींना हिवाळ्याचं आकर्षण. या दिवसांत अतिथंड प्रदेशातील असंख्य लहान-मोठ्या पक्ष्यांची मांदियाळी कुंभ मेळा साजरा करण्यासाठी या महाराष्ट्रभूमीत आपल्या चिमण्या पायांची पायधूळ झाडण्यासाठी अवतरतात. हे विहंग केवळ डोळ्यांत साठवून न ठेवता त्यांना छायाचित्रकात (कॅमेऱ्यात) कायमचं अडकवून ठेवण्यासाठी आमची कोण धांदल उडते. साहजिकच या मांदियाळीत सहभागी होण्यासाठी आम्हीही हिवाळ्याची एखाद्या चातकाप्रमाणं वाट पाहात असतो. आठवड्यातून किमान एक दिवस आणि रविवारचा दिवस टाळून आम्ही या वेळी शनिवारी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

सकाळी सहा वाजताच आमचं पुण्यनगरीतून निर्गमन झालं. कात्रज घाटमार्गे मी, चारुदत्त देशपांडे, कुमार आणि
ब्लॅक हेडेड बंटिंग (कृष्णशीर भारीट)
सौ. अमृता जोगळेकर असे चौघे होतो. नेहमीच असतो म्हणा. खेड शिवापूरला गणेश प्रसाद हॉटेलमध्ये सकाळी सकाळी पोहे चापून आणि फक्कड चहा मारून आम्ही इच्छित स्थळी निघालो. पुणे-बंगळूर महामार्गावरील नसरापूर फाट्यावरून आम्ही उजवीकडे वळून राजगड किल्ल्याच्या परिसराकडे दरमजल वाटचाल सुरू केली. काही अंतर पार पडले असेल तोच रस्त्यालगतच्या एका मोकळ्या शिवारातल्या बाभळीच्या झाडावर काही हालचाल दिसली आणि पाय आपसूकच ब्रेकवर दाबले गेले. बारकाईनं पाहता ते ब्लॅक हेडेड बंटिंग (कृष्णशीर भारीट) असल्याचं लक्षात आलं आणि त्यांना टिपण्यासाठी आम्ही सज्ज झालो. ही मंडळी हिवाळ्यात स्थलांतर करून इथं येतात. त्यांचेच भाईबंद क्रेस्टेड बंटिंग (युवराज) हा इथला कायमचा निवासी आहे. मनसोक्त छायाचित्रं काढल्यानंतर आम्ही पुढं मार्गस्थ झालो.

सुरवातीला वर्णन केलेलं ठिकाण आलं. ओढ्याच्या पुलावर काही वेळ बसल्यानंतर आम्ही ओढ्यात उतरलो. थोडा वेळ पक्ष्यांची वाट पाहिली पण बुलबुलशिवाय इतर पक्षी पाण्यावर येतच नव्हते. त्यांचा किलबिलाट मात्र कानावर पडत असल्यामुळं  आमचं मन आशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात होतं. कदाचित आमची चाहूल लागल्यामुळं एकही पक्षी आमच्या समोरच्या पाण्यावर काही आले नाहीत. नाही म्हणायला एक व्हाईट ब्रेस्टेड वॉटरहेन (लाजरी पाणकोंबडी) मात्र आपल्या नावाला साजेसं लाजत लाजत पात्रातल्या एका मोठ्या खडकाआडून पाण्यावर आली आणि पाणी पिऊन निघून गेली. तिथं सावली दाट असल्यामुळं केवळ पाहण्यापलिकडं आम्ही काहीच करू शकलो नाही. आता बसण्यात अर्थ नाही, हे लक्षात आल्यानंतर उठण्याशिवाय अन्य काहीच पर्याय नव्हता. पुन्हा पुलावर आलो. नेमक्या त्याच वेळी जवळच राहणारी शाळकरी मुलं आली आणि सकाळी इथं भरपूर पक्षी असतात, असं सांगितलं. त्यांच्या मुखानं जणू देवच बोलला. पुढच्यावेळी पुण्याहून निघाल्यानंतर थेट इथंच येऊन ठाण मांडण्याचा संकल्प करून आम्ही पुढं निघालो.

पफ थ्रोटेड बॅबलर (गवई रानभाई)
काही अंतर पार केल्यानंतर अचानक रस्त्यावर हालचाल दिसली. एक नव्याच प्रकारचा पक्षी रस्त्यावर पडलेलं त्याचं खाद्या टिपण्यात मश्गूल झाला होता. रस्त्यावर रहदारी जवळजवळ नव्हतीच. पाय ब्रेकवर जाणं साहजिकच होतं. जागच्या जागी थांबून आम्ही आमची छायाचित्रकं सरसावली. हा होता आणखी एक स्थानिक पण कमी दिसणारा पक्षी दिसला. हा होता पफ थ्रोटेड बॅबलर (गाणारा रानभाई). नेहमी थव्यानं दिसणाऱ्या सातभाईंचा हा भाईबंद, पण कदाचित एकट्यानं फिरणारा. खाण्यात मग्न असल्यामुळं त्याचं गाणं काही आम्हाला ऐकायला मिळालं नाही. तो खाणं शोधत होता सावलीत, पण तरीही आम्हाला काही बरी छायाचित्रं मिळालीच. तेवढ्यात एक मोटरसायकलस्वार आला आणि आमचा हा छोटा दोस्त भुर्रकन उडून गेला.

काही अंतर जाताच पुन्हा गाडी थांबवावी लागली. तिथं एका शेताच्या तारेच्या कुंपणावर यलो आईड बॅबलरचा
यलो आईड बॅबलर (चिपका)
(चिपका) एक छोटा थवा होता. सकाळच्या वेळी खाणं शोधत या फांदीवरून त्या फांदीवर उडणाऱ्या या पक्ष्यांची छायाचित्रं काढणं तसं अवघडच होतं. पण अखेर एका ठिकाणी ती सापडलीच. पुढं निघालो. हा प्रदेश पावसाचा असला, तरी माळरान होतं. शेतीसाठी फार पूर्वी झाडं तोडल्यामुळं हा प्रदेश उजाड झाला असावा. रस्त्याकडेच्या एका जंगली झुडुपावर तीन-चार पक्षी बसले होते. हे होते ग्रे नेक्ड बंटिंग (करड्या मानेचे भारीट). हे देखिल पाहुणे पक्षी. हिवाळ्यात या परिसरात त्यांचं मोठ्या संख्येनं आगमन होतं. वाऱ्याच्या झुळकांमुळं त्यांची पिसं उडत होती. त्यांच्या पोटावरील पिसं तपकिरी असल्याचं दिसलं. मयुरेश्र्वर अभयारण्यातही हे पक्षी मला अनेकवेळा दिसले होते. पण त्यावेळी त्यांच्या पिसांचा रंग काही दिसला नव्हता.

दुपार झाली होती. पोटात कावळे ओरडत होते. येताना तहान लाडू, भूक लाडू होतेच शिवाय च्याऊ म्याऊ होतंच. पाणी मुबलक होतं. थोडी पोटपूजा करण्यासाठी योग्य जागा पाहात होतो. एक छोटंसं गाव दिसलं. तिथं झाडांवर उडणारे स्मॉल मिनिव्हेट (छोटा निखार) दिसले. छायाचित्रं घेणं क्रमप्राप्तच होतं. ते झाल्यानंतरच पोटपूजा उरकली आणि पुढं निघालो. पक्ष्यांची चाहूल लागली की थांब, असं आमचं मार्गक्रमण होत असल्यानं सूर्य मावळतीकडे कलू लागल्याचं समजलंच नाही. माझं लक्ष आता रस्त्यावर आणि आजूबाजूच्या झाडांवर लागून राहिली होती. इतर तिघंही बारकाईनं पाहात होते. पॅकअप करण्यापूर्वी काही दिसलं तर आम्हाला हवंच होतं. तेवढ्यात एक पिवळ्या रंगाचा पक्षी उडताना दिसला. मग काय थांबलोच. थोडं आत चालत गेल्यानंतर तो कॉमन आयोरा (सुभग) असल्याचं लक्षात आलं. तो पानांच्या गर्दीत हरवला होता. काही वेळ थांबूनही तो बाहेर येण्याचं नाव काढत नव्हता. खरं तर मावळतीच्या उन्हात तो फारच छान टिपता आला असता. अखेर आम्ही पुन्हा रस्त्यावर आलो. तिथं एका कॅज्युरिनाच्या झाडावर लगबग दिसली. पाहिलं तर गोल्डन ओरिओलची (हळद्या) ती मादी होती. मग काय सरसावलेल्या छायाचित्रकांचा क्लिकक्लिकाट वाढला. तिथंच एक डोमकावळाही पक्वान्नाचा फन्ना उडवताना दिसला. योग्य फळ निवडण्यासाठी तो देखिल वटवाघळांसारखा उलटा टांगल्या अवस्थेत होता.

आता मात्र सूर्य खरोखरीच अस्ताला गेला. आमची सर्व हत्यारं व्यवस्थित ठेवून आम्ही पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. या सफरीत आम्हाला एकूण ३६ प्रकारचे पक्षी दिसले. काहींची छायाचित्रं काढता आली आणि काही फक्त दिसले. एकूण ही सफर लक्षात ठेवण्यासारखी ठरली. पुन्हा या भागात यायचंच, हे निश्र्चित करून आम्ही पुण्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

विहंगभूमी नैनिताल

अशाच एका 'रम्य' सकाळी...