सिंहगडाच्या कुशीत एक दिवस
 |
व्हर्डिटर फ्लायकॅचर (नीलांग) |
वन्यजीव आणि विशेषतः पाखरांमध्ये (त्या अर्थानं घेऊ नका हं) माझं मन अधिक रमतं. आदल्या शनिवारीच झालेल्या राजगड परिसरातील भटकंतीनंतर, राजाची लहर जशी फिरत असे, तशीच माझी फिरली आणि गुरुवारीच सिंहगड परिसर गाठायचं मी ठरवलं. ठरवलं म्हणजे काय, तडीसच नेलं. पहाटे पाच वाजता उठून आणि आवरून मी पाठीवर धनुष्यरूपी कॅमेरा आणि भातारूपी मोनोपॉड अडकवला आणि दुचाकीवरून थेट सिंहगड गाठलं. लांब कुठं जाण्याचा कार्यक्रम नसला, की इथं यावं. हमखास काहीतरी नवं मिळतं असा माझा अनुभव होता.
सिंहगड व्हॅली ही पक्षीप्रेमींची पंढरीच. सूर्योदयाच्या सुमारास ही व्हॅली जशी पक्ष्यांनी गजबजते, तशीच हौसे-नवसे-गवसे छायाचित्रकारांनीही बजबजते. कधी कधी, विशेषतः रविवारी आणि सुटीच्या दिवशी तर त्याचा इतका अतिरेक होतो, की आपापले कॅमेरे रोखून बसलेल्या छायाचित्रकारांची संख्याच पक्ष्यांपेक्षा कितीतरी जास्त भरते. शिवाय कधी कधी बसण्याच्या जागेवरून वादावादी आणि हमरीतुमरीपर्यंत प्रसंग ओढवतात. काही वेळा वनाधिकाऱ्यांच्या नावाचा हवाला देऊन बसलेल्यांना उठवण्याचीही बळजोरी केली जाते. असो. मुद्दा तो नाही.
 |
ओरिएंटल व्हाईट आय (चष्मेवाला) |
गुरुवार म्हणजे 'ऑड डे'. या दिवशी कोणीच नसेल ही अपेक्षा होती. अशीच अपेक्षा इतरही करत असतील हा मुद्दा आपण नेमका लक्षात घेत नाही. पण तुलनेनं लोक कमी होते. जे होते ते शांतपणे कॅमेरे सरसावून बसले होते. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ, राजेश शेंडकर तिथं होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आपला व्हीडिओ कॅमेरा सज्ज ठेवला होता. पॅरेडाईज फ्लायकॅचरची (स्वर्गीय नर्तक) ते वाट पाहात होते. पठ्ठ्या त्या दिवशी काही उगवलाच नाही. येणारे पक्षी नेहमीचेच होते. आम्ही वाट पाहात होतो एखादा नवा स्थलांतरित पक्षी येण्याची. नाही म्हणायला व्हर्डिटर फ्लायकॅचर (नीलांग) आणि अल्ट्रामरीन फ्लायकॅचर (निळी लिटकुरी) काही वेळ पाण्यावर येऊन गेले. व्हॅलीतल्या या पाणवठ्यावरही सर्वाधिक गडबड बुलबुल पक्ष्यांचीच होती. त्याशिवाय रेड थ्रोटेड फ्लायकॅचर, (तांबुल किंवा रक्तकंठी लिटकुरी) इंडियन रॉबिन (चिरक), ट्री पिपिट (वृक्ष चरचरी), लाफिंग डव्ह (होला), ओरिएंटल व्हाईट आय (चष्मेवाला), यलो थ्रोटेड स्पॅरो किंवा पेट्रोनिया (पिवळ्या गळ्याची चिमणी), व्हाईट रम्प्ड मुनिया (पांढऱ्या पाठीची मुनिया) यांचीही ये-जा चालू होती.
सकाळी साडेसहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आम्ही तिथंच बसलो होतो. नवीन पक्षी येण्याची शक्यता आता दुरावली होती. संध्याकाळी चारनंतरच त्यांची हालचाल सुरू होणार होती. मी आणि माझे हे मित्र पाणवठ्यावरून उठलो आणि वरच्या शेतात आंब्याच्या झाडाच्या सावलीत निवांतपणे सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. थोड्या विश्रांतीनंतर व्हॅलीत खोलवर घुसण्यासाठी सज्ज झालो. दुपारच्या वेळी अनेकांचा हाच कार्यक्रम असतो. जागा सोडल्यानंतर काही वेळा अनपेक्षितपणे काहीतरी नवीन पाहायला मिळतं, हा नेहमीचाच अनुभव.
थंडीचे दिवस आणि परिसर प्रदूषणमुक्त असल्यानं आकाश कसं निळंभोर दिसत होतं. आकाशाची निळाई
 |
ट्री पिपिट (वृक्ष चरचरी) |
पाहात असतानाच एक रॅप्टर (शिकारी पक्षी) आकाशात उडताना दिसला. सुरवातीला तो कॉमन केस्ट्रेल (खरुची) वाटला, पण पंखांची आतली बाजू केस्ट्रेलपेक्षा वेगळी होती. सूर्यप्रकाश जणू त्याच्या पंखांतून आरपार येत होते. या पक्ष्याची ओळख काही पटू शकली नाही. उडतानाची त्याची काही छायाचित्रंही टिपली. व्हॅलीच्या अंतर्भागात प्लम हेडेड पॅराकीट (तुईया), गोल्ड फ्रंटेड लीफबर्ड (ताम्रशीर पत्रगुप्त) यासारखे पक्षी दिसू शकतात. पण त्या दिवशी सामसूम होती. तिथल्या शांततेचा, हिरव्यागार वनश्रीचा आनंद लुटत आम्ही काही काळ खोऱ्यातल्या त्या भागात भटकण्यात घालवला. चार वाजत आले होते. पाणवठ्यावर परतण्याची वेळ झाली. पाणवठ्यावर येताच आमच्या दोन तरुण महाविद्यालयीन मित्रांनी इशारा दिला. त्यांनी दाखवलेल्या दिशेनं पाहिलं, तर तिथं चेंजेबल हॉक ईगलचं (व्याध किंवा मोरघार) पिलू नुकतंच येऊन बसलं होतं. पिलू कसलं, चांगला थोराडच होता. डोक्यावर अद्याप तुरा न उगवल्यानं पिलू म्हणायचं एवढंच. पटापट त्याचीही चांगली छायाचित्रं टिपली.
 |
रेड थ्रोटेड फ्लायकॅचर (तांबुल, रक्तकंठी लिटकुरी) |
पाणवठ्यावर चारनंतरही फारशी हालचाल दिसली नाही, म्हणून मी तिथून उठलो आणि खोऱ्यातल्या दुसऱ्या भागाकडे प्रस्थान ठेवलं. पाणवठ्यावरून उडालेला व्हर्डिटर फ्रायकॅचर इथंच त्याचं खाणं शोधत या झाडावरून त्या झाडावर उडत होता. एका फॅनटेल फ्लायकॅचरची (नाचरा) जोडीही नावाला साजेसं नाचरेपण सिद्ध करत होती. दाट झाडीतून बाहेर पडल्यानंतर थोडी उघडिप आणि मातीचा रस्ता आहे. तिथं थोडा वेळ थांबून मी आसमंत न्याहाळत असतानाच समोरून एक चेंजेबल हॉक ईगल डौलदारपणे उडत गेला. तो कदाचित सावजाच्या मागं असावा. तेवढ्यात ठकठक असा आवाज येऊ लागला. बारकाईनं जिवाचं कान करून मी ऐकत राहिलो. कदाचित हा आवाज एखादा सुतार किंवा तांबट पक्षी करत असावा. हे पक्षी साधारणपणे मऊ लाकूड असलेल्या झाडाच्या मजबूत फांदीला भोक पा़डतात. त्यांची मादी या सुरक्षित घरात अंडी घालते. हा आवाज झाड तोडण्याचाही असू शकेल. स्वयंपाकाचा गॅस काही सर्वांनाच परवडत नाही. गोबर गॅसची जोडणीही सगळ्यांकडेच नसते. मग पर्याय उरतो तो पारंपरिक चुलीचा. जंगलातली झाडं तोडण्याचा एक मार्ग म्हणजे एखाद्या झाडाचा बुंधा कुऱ्हाडीचे घाव घालून अर्धाच तोडतात. कालांतरानं हे झाड वाळत. वाळलेलं झाड नंतर सरपणासाठी वापरलं जातं. मी तिथं असताना काही महिला डोक्यावरून लाकडाच्या मोळ्या घेऊन येताना दिसल्या. माझ्या हातातला कॅमेरा पाहून त्या काहीशा बिचकल्या. पुणे परिसरात जी काही मोजकी जंगलं उरली आहेत, ती देखिल एक दिवस अशा प्रकारामुळं उजाड होणार आहेत. वन खात्याचं या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे निश्र्चित.
 |
यलो फ्रंटेड वुडपेकर (मराठा सुतार) |
ठकठक आवाज चालूच होता. समोरच्या डोंगरातून जसा तो येत होता, तसा माझ्या डावीकडूनही येत होता. डावीकडचा आवाज वेगळा होता. म्हणजे तिथं नक्कीच सुतारपक्षी असणार. मी पुढं झालो आणि प्रत्येक झाड स्कॅन केलं आणि तो सापडला! जंगलातल्या मातीच्या रस्त्यालगतच ते झाड होतं आणि यलो फ्रंटेड पाईड वुडपेकर (मराठा सुतार) तन्मयतेनं आपल्या जाडसर चोचीनं बुंध्यावर आघात करत होता. उभ्या जागेवरूनच त्याचे रेकॉर्ड शॉट घेतले आणि सावधपणे पुढं जाऊ लागलो. विशिष्ट अंतरावर जाऊन पुन्हा रेकॉर्ड शॉट घेतले आणि त्याच्या पुरेसं जवळ गेल्यानंतर रस्त्यावर ठाण मांडलं. तिथून मला त्याची चांगली छायाचित्रं मिळाली.
थोडा वेळ तिथं थांबून मी पुन्हा मूळच्या जागी म्हणजे पाणवठ्यावर आलो. तिथँ पॅरे़डाईज फ्लायकॅचरची मादी
 |
पॅरेडाईज फ्लायकॅचर (मादी - स्वर्गीय नर्तक) |
रोजच्याप्रमाणं फुलपाखरांच्या मागं होती. ही मादी फारच धीट आहे. बहुदा रोज येणाऱ्या छायाचित्रकारांशी तिची जणू मैत्रीच झाली आहे. उडता उडता फुलपाखरं पकडण्याची तिची चपळाई लाजबाव आहे. तासा-दीड तासांत तिनं माझ्यासमोर सात ते आठ फुलपाखरांचा फन्ना उडवला होता. पाणवठ्यामुळं फुलपाखरांची संख्याही तिथं भरपूर असते. तिचं उडतानाचं छायाचित्र मला घ्यायचं होतं. तसं ते अवघडच होतं. लेन्स बदलून मी सज्ज झालो आणि तिची काही छायाचित्रं काढली. अर्थात ती फारशी चांगली नव्हती, पण मी ती घेऊ शकतो हा विश्र्वास वाढला.
साडेपाच झाले. सिंहगडाच्या कडेवर असणारा सूर्य अस्ताला गेला आणि खोऱ्यात अंधार पडू लागला. छायाचित्रकारांची वेळ संपली. तरीही थोडा वेळ थांबून आम्ही परतीचा मार्ग धरला. मराठा सुतार आणि हॉक ईगलच्या रुपानं त्या परिसरातील आणखी दोन पक्षी पदरात पडले होते.
Comments
Post a Comment