
सिंहगडाच्या कुशीत एक दिवस व्हर्डिटर फ्लायकॅचर (नीलांग) व न्यजीव आणि विशेषतः पाखरांमध्ये (त्या अर्थानं घेऊ नका हं) माझं मन अधिक रमतं. आदल्या शनिवारीच झालेल्या राजगड परिसरातील भटकंतीनंतर, राजाची लहर जशी फिरत असे, तशीच माझी फिरली आणि गुरुवारीच सिंहगड परिसर गाठायचं मी ठरवलं. ठरवलं म्हणजे काय, तडीसच नेलं. पहाटे पाच वाजता उठून आणि आवरून मी पाठीवर धनुष्यरूपी कॅमेरा आणि भातारूपी मोनोपॉड अडकवला आणि दुचाकीवरून थेट सिंहगड गाठलं. लांब कुठं जाण्याचा कार्यक्रम नसला, की इथं यावं. हमखास काहीतरी नवं मिळतं असा माझा अनुभव होता. सिंहगड व्हॅली ही पक्षीप्रेमींची पंढरीच. सूर्योदयाच्या सुमारास ही व्हॅली जशी पक्ष्यांनी गजबजते, तशीच हौसे-नवसे-गवसे छायाचित्रकारांनीही बजबजते. कधी कधी, विशेषतः रविवारी आणि सुटीच्या दिवशी तर त्याचा इतका अतिरेक होतो, की आपापले कॅमेरे रोखून बसलेल्या छायाचित्रकारांची संख्याच पक्ष्यांपेक्षा कितीतरी जास्त भरते. शिवाय कधी कधी बसण्याच्या जागेवरून वादावादी आणि हमरीतुमरीपर्यंत प्रसंग ओढवतात. काही वेळा वनाधिकाऱ्यांच्या नावाचा हवाला देऊन बसलेल्यांना उठवण्याचीही बळजोरी केली जाते. असो....