Posts

Showing posts from 2016

विहंगभूमी नैनिताल

Image
अॅशी बुलबुल का ही वेळा काही कार्यक्रम ध्यानीमनी नसताना आखले जातात. दांडेलीचा कार्यक्रम असाच अचानक ठरला होता. काही कार्यक्रम मात्र अनमानधपक्यानं ठरवता येत नाहीत. त्यासाठी योग्य नियोजनच हवं असतं. उत्तराखंडचा कार्यक्रम त्यापैकीच एक. परंतु, तो देखिल रामभरोसेच होता. नियोजन केलं होतं, ते फक्त रेल्वेचं बुकिंग करण्यासाठी. पण हॉटेलांचं बुकिंग, फिरण्यासाठी लागणारी गाडी याचा थांगपत्ताही नव्हता. जे काही करायचं ते तिथं जाऊनच, हा आमचा निर्धार फोल ठरणार की फायदेशीर, हे प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतरच समजणार होतं. तिकिटांसाठी प्रयत्न सुरू केले ते जाण्याच्या दिवसाच्या तीन आठवडे आधी. तिकिटं मिळण्याची शक्यता धूसरच होती. पण आश्चर्य म्हणजे ती चक्क मिळाली आणि ती देखिल कन्फर्म! अलिकडे विमानप्रवास ही काही श्रीमंतांची किंवा कंपन्यांच्या खर्चात फिरणाऱ्यांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. भुर्रकन दोन-चार तासांत देशाच्या कानाकोपऱ्यात या आकाशगमनी वाहनानं जाता येतं. वेळ वाचतो हे खरं असलं तरी, काही गोष्टींना आपण मुकतो हे देखिल तितकंच खरं आहे. कार्यालयीन कामासाठी मी देखिल कंपनीच्या खर्चानं अनेकवेळा विमानप्रवास केल

अशाच एका 'रम्य' सकाळी...

Image
र म्यतेबाबत प्रत्येकाचं मत निराळं असू शकतं. पावसाळी वातावरणातली सकाळ ही रम्य कशी असू शकेल, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पडू देत बापड्यांना. एखादी गोष्ट आपल्याला कशी वाटते, हे महत्त्वाचं. इतरांना काय वाटतं याचा आपण फारसा विचार करू नये. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तर सांगायचा मुद्दा असा, की सर्द पावसाळ्यातली ती एक रम्य सकाळ होती. खरं तर पहाटेच उठून आम्ही मार्गाला लागलो होतो. मार्ग होता सातारा रस्त्यावरूनच. आमचं गंतव्य स्थान आणि आम्ही यांच्यामध्ये खेड शिवापूर ओघानंच येतं. या गावातील गणेश प्रसाद हॉटेलातली झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढं जाणं शक्यच नसतं. ...तर आम्ही मिसळीवर यथेच्छ ताव मारून भोरच्या दिशेनं गाडी हाकली. वरंध घाटातून निसर्गशोभा पाहात आणि शक्य तिथं थांबून छायाचित्रं काढण्याचा आमचा कार्यक्रम अखंडितपणे चालू असतो. परिणामी तीन तासांच्या प्रवासासाठी आम्हाला किमान पाच तास तरी मोजावे लागतातच. पण आज निसर्गाचंच काहीतरी बिनसलं होतं. भोर मागं टाकेपर्यंत पावसाची अखंड झोड चालू होती. मित्राच्याच मारूती नामक कंपनीनं तयार केलेल्या जिप्सी जातीचं वाहन आम्ही घेतलं होतं. पावसाळ

ड्रीमलँड दांडेली

Image
मधू-बाज किंवा मोहोळ घार को णत्याही गोष्टीचा योग यावा लागतो, असं म्हणतात. काही वेळा हे योग अकस्मात, कोणताही हासभास नसताना येतात. सेवानिवृत्तीनंतर हरी हरी म्हणत घरी बसून, मुला-नातवंडांना 'आमच्या काळात असं होतं', 'आम्ही बुवा असं कधीच केलं नव्हतं', असं सांगत त्यांना बोअर करण्याऐवजी आम्ही आमचा छंद जोपासला होता. घरच्यांची आपल्याला आणि आपली घरच्यांना शिंची कटकटच नको, हा आमचा खाक्या! तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हा पक्षीनिरीक्षक ज्येष्ठ नागरिकांची अनौपचारिक बैठक होते काय आणि अमृतमंथनातून ज्याप्रमाणे स्यमंतक मणी बाहेर पडला तद्वत त्यातून दांडेली बाहेर पडतं काय, सारंच न्यारं! गेल्या फेब्रुवारीतच आम्ही सर्वजण एकत्र रणथंभोरला गेलो होतो. तीन महिने म्हणजे भलताच प्रदीर्घ काळ. दांडेलीचा निर्णय पक्का होताच आम्ही उत्साहानं तयारीला लागलो. ऐनवेळी एक मोती गळाला. खरं तर आम्ही चौघं जाणार होतो. आता इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही येणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही तिघांनीच जायचं ठरवलं. पारंपरिक म्हण थोडीशी बदलून आम्ही "थ्री इज अ कंपनी, फोर इज अ क्राऊड', असं म्हणून तयारीला लागलो. सोमवारी

नवजा धबधब्याच्या गमजा

Image
  ती न ऋतुंमधला आवडता ऋतू कोणताय़ या प्रश्नाला उत्तर देणं खरंच अवघड आहे. आपल्या परीनं तीनही ऋतू चांगलेच असतात. अगदीच डावं-उजवं करायची वेळ आल्यास, आपल्यापैकी अनेकजण झट्कन पावसाळा हेच उत्तर देतील. पण उन्हाळाही महत्त्वाचा असतोच. उन्हाळाच नसेल, तर ढग कसे तयार होणार आणि ढग तयार झाले नाहीत, तर पाऊस कसा पडणार? काही लोकांना हिवाळा आवडतो. तो असतोच आवडण्यासारखा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कारणांमुळे एखादा विशिष्ट ऋतू आवडतो. आपल्याला तर बुवा सर्वच ऋतू आवडतात. पावसाळा विशेष आवडीचा एवढंच! पावसाळा म्हणजे मनमुराद भटकंती करण्याची संधी. शहरांमधून जेव्हा लोक छत्र्या आणि रेनकोट घालून किंवा मोटारीच्या काचा लावून "काय हा पाऊस', असं म्हणत असतात, तेव्हा आमच्यासारखी भटकी मंडळी भर्राट वारा आणि पावसाच्या लाटा अंगावर घेत गिरी-कंदरांचा धांडोळा घेत फिरत असतात. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, चोहीकडे पसरलेलं हिरवंगार साम्राज्य, दुथडी भरून वाहणाऱया नद्या आणि गिरी शिखरावरून समुद्रसपाटीकडे खळाळत वाहणारे ओढे, चिंब भिजलेली धरणी, आभाळाला आणखी बरस अशी वारंवार विनवणी करत असते. निसर्गाच्या सान्निध्यात असत
Image
मकरंद गडावरची थरारक चढाई ऐन वेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती. मकरंद गडाचा अखेरचा थरारक टप्पा ऐन पावसात एकांतातल्या रांगड्या मकरंद गडानं अनपेक्षितपणे एक धम्माल अनुभव दिला. किल्ला सर करण्यापूर्वी आधुनिक प्रथेप्रमाणं प्रथम नेटवर चंद्रगडाचे फोटो पाहिले. त्याचं कातिल रुपडं पाहून आम्ही खुळावलो होतो. चंद्रगडाचा परिसर असा असेल तर खुद्द गड कसा असेल? केवळ या कल्पनेनेच कधी एकदा त्या गडावर स्वारी करतो, अशी आमची स्थिती झाली होती. महाबळेश्‍वरहून चंद्रगडला जाता येत असल्याची माहिती आमच्या एका भटक्‍या मित्रानं दिली होती. त्यासाठी एका पूर्ण दिवसाची तंगडतोड करावी लागत असल्याचंही तो बोलल्याचं लक्षात होतं. दिवसभर तंगडतोड करण्याऐवजी सरळ 'खुष्की'च्या मार्गानं जावं असं ठरलं. गडावर जाण्यासाठी वाई-जोर-ढवळ्या घाट-ढवळ्या गाव-चंद्रगड असा दुसरा मार्ग आम्ही शोधून काढला आणि त्याच रस्त्यानं जावं, हा निर्णय पक्का झाला. ठरल्या वेळी आम्ही जमलो आणि सातारा रस्त्यानं मार्गी लागलो. गाडी धावत असतानाच चंद्रगडाबाबत चर्चा सुरू झाली. ढवळ्या घाटातून गा
Image
...आणि अनुभवले थरारक क्षण! (कथा रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील शिकारीची) सो यी-सुविधांची उपलब्धता जशी वाढत जाते, तशी माणसाची सुखाची व्याख्या बदलत जाते. आता हेच पाहा ना, सुमारे ४० वर्षांपूर्वीची धुरांच्या रेषा हवेत सोडत झुकझुक करत जाणारी आगीनगाडी जाऊन 'भों' करत चालणारी वाऱ्याशी स्पर्धा करत डिझेल इंधनावर धावणारी रेल्वे आली. पूर्वी केवळ 'फर्स्ट क्लास' हाच 'एअर कंडिशण्ड' होता, आता दुसऱ्या वर्गालाही ती सुविधा मिळाली आहे. पण गाडीतून फिरण्याची त्या वेळची मजा काही आता उरलेली नाही. कोळशानं काळेमिट्ट झालेले चेहरे आणि कपडे धुवून आया काकुळतीला येत. आता दोन हजार किलोमीटरच्या प्रवासानंतरही लोक ताजेतवाने असतात. हा काळाचा महिमा आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की अस्मादिक आपल्या सात इष्टमित्रांसह इतरवेळी सूर्याच्या धगीनं होरपळून निघणाऱ्या, पण केवळ याच दिवसांत शीतल असणाऱ्या राजस्थानातील रणथंभोरच्या अभयारण्याकडे निघालो होतो. आमचे मित्र चारूदत्त देशपांडे यांनी यापूर्वी चार-पाच वेळा रणथंभोरला भेट दिल्यामुळे, आमच्या आठ जणांच्या टीमचं नेतृत्त्व ओघानंच त्यांच्याकडे आलं. रेल
Image
'रॅप्टरलँड'ची अद्भुत सफर ब्लॅक विंग्ड काईट (कापशी) गे ल्या वर्षाच्या तुलनेत पुण्यात यंदा हिवाळ्यानं चांगलंच गारठवलंय. रामप्रहरी कुठल्याही रस्त्यावरून जा, स्वेटर, मफलर आणि डोक्याला माकडटोप्या गुंडाळलेली मंडळी 'मॉर्निंग वॉक' करताना दिसून येतात. थंडीची चाहूल लागल्या दिवसापासूनच पक्षीप्रेमी मंडळी आपापली आयुधं, म्हणजे कॅमेरे, लेन्सेस आणि ट्रायपॉड वगैरे सज्ज ठेवतात. त्यांना वेध असतात, ते थंडीत आपल्या भागात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची. त्यासाठी भिगवणमधील उजनी बॅकवॉटर, वीर धरण आदी ठिकाणी जायचे प्लॅन्स आखण्यात येतात. हे झालं फ्लेमिंगो (रोहित किंवा अग्निपंख), बार हेडेड गूझ (पट्टकादंब), डेमोसाईल क्रेन आदी मोठ्या पक्ष्यांबाबत. छोट्या पक्ष्यांसाठी सिंहगड व्हॅली, मुळशी, पानशेत अशा ठिकाणी पक्षीप्रेमी गर्दी करतात. हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत पांघरुणातून बाहेर पडण्याची खरं तर इच्छा होत नाही. पण पाहुण्या पक्ष्यांसह स्थानिकांनाही भेटण्याची ओढ अनिवार असल्यानं, पांघरूण झटकून मी तयारीला लागलो. तयार होत असतानाच मोबाईल खणखणला. पलिकडून आमच्या ग्रुपमधले एक मित्र विचारत होते, 'झा
Image
सिंहगडाच्या कुशीत एक दिवस व्हर्डिटर फ्लायकॅचर (नीलांग) व न्यजीव आणि विशेषतः पाखरांमध्ये (त्या अर्थानं घेऊ नका हं) माझं मन अधिक रमतं. आदल्या शनिवारीच झालेल्या राजगड परिसरातील भटकंतीनंतर, राजाची लहर जशी फिरत असे, तशीच माझी फिरली आणि गुरुवारीच सिंहगड परिसर गाठायचं मी ठरवलं. ठरवलं म्हणजे काय, तडीसच नेलं. पहाटे पाच वाजता उठून आणि आवरून मी पाठीवर धनुष्यरूपी कॅमेरा आणि भातारूपी मोनोपॉड अडकवला आणि दुचाकीवरून थेट सिंहगड गाठलं. लांब कुठं जाण्याचा कार्यक्रम नसला, की इथं यावं. हमखास काहीतरी नवं मिळतं असा माझा अनुभव होता. सिंहगड व्हॅली ही पक्षीप्रेमींची पंढरीच. सूर्योदयाच्या सुमारास ही व्हॅली जशी पक्ष्यांनी गजबजते, तशीच हौसे-नवसे-गवसे छायाचित्रकारांनीही बजबजते. कधी कधी, विशेषतः रविवारी आणि सुटीच्या दिवशी तर त्याचा इतका अतिरेक होतो, की आपापले कॅमेरे रोखून बसलेल्या छायाचित्रकारांची संख्याच पक्ष्यांपेक्षा कितीतरी जास्त भरते. शिवाय कधी कधी बसण्याच्या जागेवरून वादावादी आणि हमरीतुमरीपर्यंत प्रसंग ओढवतात. काही वेळा वनाधिकाऱ्यांच्या नावाचा हवाला देऊन बसलेल्यांना उठवण्याचीही बळजोरी केली जाते. असो.