 |
मधू-बाज किंवा मोहोळ घार |
कोणत्याही गोष्टीचा योग यावा लागतो, असं म्हणतात. काही वेळा हे योग अकस्मात, कोणताही हासभास नसताना येतात. सेवानिवृत्तीनंतर हरी हरी म्हणत घरी बसून, मुला-नातवंडांना 'आमच्या काळात असं होतं', 'आम्ही बुवा असं कधीच केलं नव्हतं', असं सांगत त्यांना बोअर करण्याऐवजी आम्ही आमचा छंद जोपासला होता. घरच्यांची आपल्याला आणि आपली घरच्यांना शिंची कटकटच नको, हा आमचा खाक्या! तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हा पक्षीनिरीक्षक ज्येष्ठ नागरिकांची अनौपचारिक बैठक होते काय आणि अमृतमंथनातून ज्याप्रमाणे स्यमंतक मणी बाहेर पडला तद्वत त्यातून दांडेली बाहेर पडतं काय, सारंच न्यारं!
गेल्या फेब्रुवारीतच आम्ही सर्वजण एकत्र रणथंभोरला गेलो होतो. तीन महिने म्हणजे भलताच प्रदीर्घ काळ. दांडेलीचा निर्णय पक्का होताच आम्ही उत्साहानं तयारीला लागलो. ऐनवेळी एक मोती गळाला. खरं तर आम्ही चौघं जाणार होतो. आता इतक्या शॉर्ट नोटीसवर कोणीही येणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही तिघांनीच जायचं ठरवलं. पारंपरिक म्हण थोडीशी बदलून आम्ही "थ्री इज अ कंपनी, फोर इज अ क्राऊड', असं म्हणून तयारीला लागलो. सोमवारी २ मे रोजी सकाळी ६ वाजता आम्ही प्रस्थान ठेवलं.
 |
राखी डोक्याची मैना |
पुण्याहून दांडेली सुमारे ४५० किलोमीटर आहे. धारवाडमार्गे जाण्याऐवजी आम्ही बेळगाव-खानापूर-हल्याळ हा मार्ग धरला. खरं तर हा रस्ता थोडा लांबून असला, तरी काहीसा निवांत आहे. दांडेलीत ४-४.३० च्या सुमारास पोचलो. नेहमीच्या प्रथेप्रमाणं हॉटेलचं बुकिंग केलेलं नव्हतं. बस स्थानकासमोरील साई पॅलेस हॉटेलमध्ये सहजपणे जागा मिळाली. एकट्या माणसासाठी या हॉटेलात सिंगल रूमही आहेत. भगवान सहस्ररश्मी अद्याप तळपत असल्यानं, हातातला वेळ वाया घालवण्याऐवजी फ्रेश होऊन आम्ही लगेच गणेशगुडीकडं कूच केलं. संध्याकाळच्या वेळी आपल्या रूस्टिंगच्या ठिकाणी म्हणजे विश्रांतीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी इथं मलबार पाईड हॉर्नबिल (धनेश) मोठ्या संख्येनं येतात. रजनीकांत अस्ताचली निघालेलेच होते. त्यांची प्रभा जोपर्यंत आहे, तोपर्यंत काही फोटो पदरात पाडून घ्यावेत, म्हणून आम्ही आमचे कॅमेरे सज्ज ठेवले होते. धनेशांनी आम्हाला अजिबात निराश केलं नाही. जोडी-जोडीनं एकामागून एक ते येत राहिले आणि आम्ही त्यांचे फोटो घेत राहिलो. सूर्यानं अखेर डोंगरामागं दडी मारली आणि संध्याकाळच्या शीतल वायूचा काही काळ आस्वाद घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.
 |
छोटा किलकिला किंवा धीवर |
खरं तर अमुकच ठिकाण पाहायचं, असं काही आम्ही ठरवलं नव्हतं. अक्षरशः वाट फुटेल तिकडं जायचं, असा आमचा नेहमीचा परिपाठ. गणेशगुडी, अणशी आणि उळवी हा भाग आम्ही शेवटच्या दिवसासाठी राखून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही जंगलातल्या गुंड नावाच्या गावाजवळची सिंथेरी रॉक्स पाहून उळवीपर्यंत जाऊन यायचं ठरवलं. आणि निघालो. जुन्या दांडेलीतून काळी नदीचा पूल ओलांडून आम्ही निघालो. साधारण वीस किलोमीटरवर बडा कानशिराडा (कानडीमध्ये याचा उच्चार वेगळा असावा) नावाचा तलाव लागला. पाणथळ जागी सहसा पक्षी असतात, म्हणून गाडी लावून आम्ही तलावावर ठिय्या दिला. पण बगळ्यांशिवाय अन्य काहीच दिसलं नाही. नाही म्हणायला एक नदी सुरय दिसला. या रस्त्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. कुळगी नेचर कँप हा त्यापैकीच एक. आम्ही सकाळीच बाहेर पडल्यामुळे पोटोबा रिकामे होते. सुदैवानं कुळगीच्या एकमेव चौकात एक छानपैकी हॉटेल होतं. जंगल मे मंगलच जणू. तिथं आम्ही डोसे आणि पुरी भाजी अशी भक्कम न्याहारी केली. हॉटेलचा मालक मराठी बोलणारा सारस्वत वाटला. त्यानं छतावर बांबू कापून चिमण्यांसाठी घरटी केली आहेत. आठही बांबूमध्ये चिमण्या सुखानं राहतात! कुळगीतून एक रस्ता अंबिकानगरकडे आणि दुसरा उळवी-सिंथेरी रॉक्सकडे जातो.
सिंथेरी रॉक्स दांडेलीपासून सुमारे ३२ किलोमीटरवर आहे. सिंथेरी रॉक्स म्हणजे ग्रॅनाईटचा सुमारे ४० फूट उंच आणि शे-सव्वाशे फूट रुंदीचा प्रचंड मोठा खडक आहे. या खडकाच्या पायथ्याशी पाण्याच्या प्रवाहानं गुहा झाल्या आहेत. तिथपर्यंत पोचण्यासाठी एक छोटी टेकडी उतवारी लागते. साईट सीईंग हा काही आमचा मुख्य उद्देश नव्हता. पण प्रसिद्ध असलेलं ठिकाण न पाहता जाणंही योग्य नसतं.
 |
महाभृंगराज |
जंगल असलं, तरी पक्के आणि चांगले डांबरी रस्ते होते. गाडीचा वेग चाळीसहून अधिक नव्हता. जंगलातून पक्ष्यांचे विविध प्रकारचे सुस्वर ऐकू येत होते. ही वेळ आणि परिसर वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अयोग्य असतो. दाट झाडीमुळे पक्षी उघड्यावर सहसा येत नाहीत आणि आलेच, तर फार वेळ थांबत नाहीत. जंगलात काही ठिकाणी ओपनिंग असतात. तिथं पक्ष्यांचा किलबिलाट अधिक प्रमाणात ऐकू येतो. अशा जागा सापडल्या, की आम्ही थांबत असू. उळवीपर्यंत आणि तिथून परत दांडेलीकडे परत येताना आम्हाला व्हेलवेट फ्रंटेड नटहॅच, मलबार व्हाईट हेडेड स्टार्लिंग, प्लम हेडेड पॅराकीट, व्हर्नल हँगिंग पॅरट, रॅकेट टेल्ड ड्रोंगो, ब्लॅक नॅप्ड मोनार्क, यलो ब्राऊड बुलबुल, मलबार पाईड हॉर्नबिल, टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर, व्हाईट रम्प्ड शामा, मलबार जायंट स्क्विरल आदी मंडळी दिसली.
तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही गणेशगुडीकडे प्रस्थान ठेवलं. व्यक्तीशः मला मलबार ट्रोगोन या पक्ष्याची छायाचित्र हवी होती. माझ्या ठेव्यामध्ये त्याची भर पडणं आवश्यक होतं. गणेशगुडी ही काळी नदी प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली वसाहत आहे. बस स्थानकासमोर एक छानदार हॉटेल आहे. तिथं सुग्रास पुरी-भाजी आणि चहाचा नेहमीसारखाच भक्कम आहार घेऊन आम्ही अणशीच्या मार्गानं निघालो. राखीव जंगलांमध्ये असते तशी सफारी घेण्यात आम्हाला काही स्वारस्य नव्हतं. त्यापेक्षा वाट दिसेल त्या रस्त्यानं गेल्यास, नेहमीपेक्षा अधिक काही चांगलं मिळू शकतं, असा आमचा अनुभव.
 |
तांबड्या पंखाचा हरियल |
आडवळणाचा रस्ता घ्यायचा हा आमचा शिरस्ता इथंही पाळला. चांगला रस्ता दिसला, की आम्ही आत शिरायचो. काही ठिकाणी दाट जंगलांमुळे ऐकू यायचं पण दिसायचं काहीच नाही. तरीही एके ठिकाणी रॅकेट टेल्ड ड्रोंगो, गोल्डन बॅक्ड वुडपेकर ही मंडळी दिसली. भरपूर झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास काही जाणवत नव्हता. दिवसभर फिरल्यानंतर परत जाताना एके ठिकाणी पक्ष्यांची भरपूर हालचाल जाणवली. रस्त्याकडेला गाडी थांबवून आम्ही कानोसा घेऊ लागलो. तिथल्या एका झाडाच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारावरून, माझे मित्र कुमार जोगळेकर यांनी या झाडाचं नामकरण प्रेगनंट वूमन असं करून टाकलं. याच झाडावर पक्ष्यांची मांदियाळी होती. जोगळेकरांच्या पत्नी अमृता या तोपर्यंत पुढे चालत गेल्या. तिथं एक गुराखी होता. त्यानं एका पाणवठ्याची माहिती दिल्यानंतर आम्ही त्याच्या शेताजवळील पाणवठ्यावर जाऊन बसलो. मलबार व्हाईट हेडेड स्टार्लिंग, रॅकेट टेल्ड ड्रोंगो, प्लम हेडेड पॅराकीट यांची तिथं मोठी लगबग होती. तिथून काही अंतरावर गोल्ड फ्रंटेड लीफबर्डचं जोडपं दिसलं. एक शेकरू तर गाडीवर येऊन बसलं होतं. सूर्य मावळतीकडे गेल्यानंतर आम्ही पुन्हा दांडेलीत परतलो.
 |
बकचंचू किलकिला |
आता वेळ झाली होती पुण्याला परतायची. सकाळीच आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. नेहमीच्या रस्त्यानं न जाता आता आम्ही लोंढा-बेळगाव हा रस्ता पकडला. मुख्य रस्त्यावरून वळाल्यानंतर एक ओढा लागतो. उन्हाळ्यात तो कोरडाच असतो, पण आम्ही ओढ्याकडे येत असतानाच निर्मनुष्य असलेल्या ओढ्याजवळच्या एका झाडावरून शॉर्ट टोड ईगल उडत गेला. संधी हुकल्यानं चुकचुकत असतानाच ओरिएंटल हनी बझर्डचं तिथं आगमन झालं. त्याचा माग काढत गेलो. तो वन खात्याच्या चौकीमागच्या झाडावर बसला होता. त्याचे छानदार फोटो मिळाले. याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक तळं आहे. या तळ्याचा शोध आदल्या दिवशीच लागला होता. सकाळी तिथं जाऊन बसायचं आणि साडेनऊपर्यंत लोंढ्याकडे निघायचं, असा विचार करून तळ्याकाठी बसकण मारली.
दांडेलीपासून अवघ्या चार किलोमीटरवरचं हे तळं, पक्षी निरीक्षकांसाठी अक्षरशः नंदनवन ठरावं. इथं कॉमन किंगफिशर, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, व्हाईट ब्राऊड वॅगटेल, व्हाईट आयबिस, व्हेलवेट फ्रंटेड नटहॅच, व्हाईट रम्प्ड शामा, ब्लॅक नेप्ड मोनार्क, स्टॉर्क बिल्ड किंगफिशर, पोंपाडूर ग्रीन पीजन, ब्राऊन हेडेड बी-ईटर, ग्रेटर कॉकल, टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर, ओरेंज हेडेड थ्रश यांनी दर्शन दिलं.
 |
ताम्रशीर पत्रगुप्त |
उन्हं वाढू लागली होती. आता मात्र पुण्याकडे निघायलाच हवं होतं. माझ्या आठवणीतला लोंढ्याचा रस्ता वेगळा होता. त्यावेळी या रस्त्यावर रान आवळ्याची खूप झाडं होती. आता मात्र एकही दिसलं नाही. शेतीसाठी बरीच जंगलतोडही झाली आहे. अखेर लोंढ्यात आलो. जंगलाची हद्द संपली होती. नंदगड-खानापूरमार्गे थेट बेळगावात आलो आणि तिथं न थांबता पुण्यात पोचलो. या दौऱ्यात आम्ही तिघंच असलो, तरी खूप मजा आली आणि भरपूर पक्षी पाहता आले. दांडेलीनं पुन्हा हिवाळ्यात येण्याचं आवताण दिल्यानं, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तर भेटूच पुढच्या वेळी!
सर लिंकमध्ये जाऊन तुमचा लेख वाचला, खुप छान आहे, आता मला हा परीसर लहानपणापासुन माहीत असल्यामुळे काही नाही, पण ज्यांनी नव्याने हा लेख वाचला तर तो स्वतः ला द
ReplyDeleteसर लिंकमध्ये जाऊन तुमचा लेख वाचला, खुप छान आहे, आता मला हा परीसर लहानपणापासुन माहीत असल्यामुळे काही नाही, पण ज्यांनी नव्याने हा लेख वाचलातर तो स्वतः ला दांडेलीला जाण्यापासुन रोखु शकणार नाही......
ReplyDeleteNehmi pramaane chaan, mala dandelichi trip aathawali.
ReplyDelete