अशाच एका 'रम्य' सकाळी...

म्यतेबाबत प्रत्येकाचं मत निराळं असू शकतं. पावसाळी वातावरणातली सकाळ ही रम्य कशी असू शकेल, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पडू देत बापड्यांना. एखादी गोष्ट आपल्याला कशी वाटते, हे महत्त्वाचं. इतरांना काय वाटतं याचा आपण फारसा विचार करू नये. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तर सांगायचा मुद्दा असा, की सर्द पावसाळ्यातली ती एक रम्य सकाळ होती. खरं तर पहाटेच उठून आम्ही मार्गाला लागलो होतो. मार्ग होता सातारा रस्त्यावरूनच. आमचं गंतव्य स्थान आणि आम्ही यांच्यामध्ये खेड शिवापूर ओघानंच येतं. या गावातील गणेश प्रसाद हॉटेलातली झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढं जाणं शक्यच नसतं.

...तर आम्ही मिसळीवर यथेच्छ ताव मारून भोरच्या दिशेनं गाडी हाकली. वरंध घाटातून निसर्गशोभा पाहात आणि शक्य तिथं थांबून छायाचित्रं काढण्याचा आमचा कार्यक्रम अखंडितपणे चालू असतो. परिणामी तीन तासांच्या प्रवासासाठी आम्हाला किमान पाच तास तरी मोजावे लागतातच. पण आज निसर्गाचंच काहीतरी बिनसलं होतं. भोर मागं टाकेपर्यंत पावसाची अखंड झोड चालू होती. मित्राच्याच मारूती नामक कंपनीनं तयार केलेल्या जिप्सी जातीचं वाहन आम्ही घेतलं होतं. पावसाळ्यात असली गाडी बरी पडते. गाडीच्या काचा पूर्णपणे वर होत्या. हवेला आत येण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. हवेच्या एका झुळुकेलाही आम्ही पारखे झालो होतो, पण समोरच्या बाजूच्या कोणत्यातरी अज्ञात छिद्रातून पाण्याची बारीक धारेमुळे मात्र गाडी बाहेरच्याप्रमाणेच आतूनही भिजलेली होती.

धो धो पडणाऱ्या पावसानं थोडा वेळ तरी उघडीप द्यावी, अशी आमची इच्छा होती. उजव्या बाजूला नीरा भाटघर धरणाचं बॅकवॉटर दिसत होतं. संपूर्ण धरित्री कशी ओलीचिंब आणि हिरवीगार झाली होती. या हिरव्या भूमातेला कॅमेराबद्ध करण्याची आमची मनीषा मात्र वरुणराजाला पसंत नसावी. म्हणूनच त्यानं संततधारेत खळ पडू दिलं नाही. बॅकवॉटरच्या पाण्यात डुंबणाऱ्या म्हशी, त्यांच्याभोवती गोचिड्या आणि उडते किडे पकडण्यासाठी घुटमळणारे गायबगळे, अशी मनमोहक दृष्यं मागे टाकून आम्हाला पुढं जाणंच भाग होतं. आमचा चक्रधर तर रस्त्यावरची नजर इतरत्र वळवायलाही तयार नव्हता. एकटक रस्यावर नजर ठेवणारा हा चक्रधर थोडासा धास्तावल्यासारखा दिसत होता. मुसळधार पावसात गाडी चालवण्याचं त्याचं कसब, ताशी तीसच्या वेगामुळं लक्षात येत होतं. या वेगानं आपण कोकणात पोचणार कधी आणि तिथून परत येणार कधी, या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नव्हतं.

साधारण तासभर गेल्यावर 'च्यायला' असं स्वतःशीच पुटपुटून त्यानं माझ्याकडे अपेक्षेनं पाहिलं. त्याच्या नजरेतली अजीजी मला सर्व काही सांगून गेली. ये बाबा, असं म्हणून आम्ही गाडीतल्या गाडीतच जागेची अदलाबदल केली. आता चक्रधराची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली. ताशी तीसच्या वेगामुळं आधीच आमचं शेड्यूल मागं पडलं होतं. ते भरून काढण्यासाठी मागच्या आसनावरून प्रोत्साहन देणारी 'आता हान कना कना', अशी आरोळी आली आणि आपोआप हात आणि पाय दोन्ही शिवशिवू लागले. उजव्या पायानं एक्सलरेटरवरचा दाब वाढवला आणि दुप्पट वेगानं गाडी पुढं निघाली. पावसामुळं वाटेत थांबण्याची सोय नव्हती. एखादा धबधबा येईपर्यंत गाडी रेटत न्यावी, असा मी मनोमन विचार केला.

आता डोंगरभाग सुरू झाला होता. पावसाची रिपरिप कमी झाली होती. वळणावळणांचा डोंगरी रस्ता लागला, तेव्हा पाऊस गायब झाला खरा, पण त्याची जागा धुक्यानं घेतली. धुकंही एवढं दाट की दहा-पंधरा फुटांवरचंही काही दिसू नये. या रस्त्यावर एक धबधबा आहे. हा काही नैसर्गिक धबधबा नाही. रस्ता तयार करण्यासाठी इथले दगड फोडले होते. डोंगरउतारावर अचानक काटकोन झाल्यामुळे हा धबधबा तयार झाला आहे. त्याचं लोकेशन साधारण लक्षात होतं, पण दिसत काहीच नसल्यामुळे तो मागे गेला की पुढे आहे याचा वेध घेतच आम्ही पुढे जात होतो. शेवटी एकदाचा तो सापडला. दिसला नाही पण पाण्याच्या कोसळण्याच्या आवाजामुळे सापडला. पाऊस नव्हताच. गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि दाट धुक्यातून जाणाऱ्या रस्त्याचे, धबधब्याचे फोटो काढले. काही तरुण तरुणीही तिथं होते. ते सेल्फी काढण्यात मग्न होते.

घाटातल्या कावळा किल्ल्याच्या परिसरात, काळ्याकभिन्न पत्थराच्या आडोशाला जवळच्याच गावातील अनेकांनी टपऱ्या सुरू केल्या आहेत. सर्दाळलेल्या या हवेत भजी आणि चहाचा आस्वाद, हा स्वर्गसुखाचा आनंद असतो. तो लुटण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. खरं तर भजी खाण्याची काहीच गरज नव्हती. आम्ही आमची भूक राखून ठेवली होती. पण असल्या हवेत, चुलीच्या उबेत गरम भजी आणि चहा न घेताच पुढे जाववत नव्हतं इतकंच. एकच प्लेट भजी चौघांनी वाटून खाल्ली. या टपऱ्यांच्या परिसरातून समोरचं दरीचं दृश्य तर लाजवाब! सह्याद्रीचं रौद्रभीषण तरीही लोभसवाणं वाटणारं रुप इथून मनसोक्त पाहता येतं. घाटाखाली कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे नावाचं एक गाव लागतं. त्या गावात एक हॉटेल आहे. नाव काही लक्षात नाही, पण तिथं मासे चांगले मिळतात म्हणून आमची ही यातायात चाललेली होती.

अगदी योग्य वेळी आम्ही लोणेरेला पोचलो. पावसाळा असला, तरी काही प्रकारचे मासे हमखास मिळतात. पॉपलेट, सुरमई, बांगडा यासारखे ओळखीचे प्रकार मिळाले नाहीत, तरी अनोळखी का होईना हॉटेलवाल्याच्या विश्र्वासावर आम्ही ते मुकाट खातो. मासे करण्याची पद्धत आणि ते वापरत असलेले मसाले, याच्यातच खरं गुपित दडलेलं असतं. मासे कोणते हा विषय तसा गौणच नाही का! असो. या मासेपुराणावर पुन्हा कधी तरी.
जेवणानंतर लगेच आमचा परतीचा प्रवास सुरू होतो. हे परतणं मात्र आता ताम्हिणी घाटातून असतं. वर्दळ कमी हे एकमेव कारण. ताम्हिणीच्या सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध झालेला धबधबा मागे पडला, की थेट पुणंच!






Comments

Popular posts from this blog

विहंगभूमी नैनिताल