विहंगभूमी नैनिताल


अॅशी बुलबुल
काही वेळा काही कार्यक्रम ध्यानीमनी नसताना आखले जातात. दांडेलीचा कार्यक्रम असाच अचानक ठरला होता. काही कार्यक्रम मात्र अनमानधपक्यानं ठरवता येत नाहीत. त्यासाठी योग्य नियोजनच हवं असतं. उत्तराखंडचा कार्यक्रम त्यापैकीच एक. परंतु, तो देखिल रामभरोसेच होता. नियोजन केलं होतं, ते फक्त रेल्वेचं बुकिंग करण्यासाठी. पण हॉटेलांचं बुकिंग, फिरण्यासाठी लागणारी गाडी याचा थांगपत्ताही नव्हता. जे काही करायचं ते तिथं जाऊनच, हा आमचा निर्धार फोल ठरणार की फायदेशीर, हे प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतरच समजणार होतं. तिकिटांसाठी प्रयत्न सुरू केले ते जाण्याच्या दिवसाच्या तीन आठवडे आधी. तिकिटं मिळण्याची शक्यता धूसरच होती. पण आश्चर्य म्हणजे ती चक्क मिळाली आणि ती देखिल कन्फर्म!

अलिकडे विमानप्रवास ही काही श्रीमंतांची किंवा कंपन्यांच्या खर्चात फिरणाऱ्यांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. भुर्रकन दोन-चार तासांत देशाच्या कानाकोपऱ्यात या आकाशगमनी वाहनानं जाता येतं. वेळ वाचतो हे खरं असलं तरी, काही गोष्टींना आपण मुकतो हे देखिल तितकंच खरं आहे. कार्यालयीन कामासाठी मी देखिल कंपनीच्या खर्चानं अनेकवेळा विमानप्रवास केलाय. वेळेवर पोचणं, घड्याळ्याच्या तालावर आपलं काम करणं आणि काम झाल्यानंतर लगेच परत फिरणं हे ओघानंच आलं. पण मला मनापासून विमानप्रवास आवडत नाही. घरापासून विमानतळापर्यंतचा प्रवास कंटाळवाणा असतो. एकदा का विमानतळावरचे सर्व सोपस्कार पार पाडून विमानात बसलं, की मुखस्तंभासारखं बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अगदीच कंटाळा आल्यास लॅपटॉप उघडून खूप कामात असल्याचा आव आणावा लागतो. त्याचाही कंटाळा आल्यास आसनाची आरामखुर्ची बनवून झोपणं, हा देखिल एक पर्याय असू शकतो. शेजारचा प्रवासी बोलका असला, तर ठीक नाहीतर मुकाट कोशात शिरणंच योग्य!
ब्लॅक हेडेड जय

याउलट रेल्वेप्रवास मनाला तरतरी आणणारा, उत्साह वाढवणाराच असतो असा माझा अनुभव आहे. एकट्यानं प्रवास करत असलं, तरी एकटेपणाची भावना पूर्णपणे पुसून टाकणारा असतो. अगदी थ्री टियर असो वा टू टियर. शेजारचा किंवा समोरचा एखादा तरी प्रवासी बोलघेवडा असतोच असतो. अनोळखी असणारे, भिन्न प्रांतातील दोन सहप्रवासी छान गप्पा मारताना पाहून इतरही त्यात सहभागी होतात. रेल्वे स्टेशनात पोचून आपला डबा शोधून सामानाची लावालाव करेपर्यंत माणसं या ना त्या स्वरूपात भेटतच असतात. अशा सहप्रवाशांपैकी अनेकांचे आजही माझे चांगले संबंध आहेत.

खांद्यावर उपरणं, एका हातात डिस्पोसेबल कप आणि दुसऱ्या हातात चहाची किटली घेऊन या डब्यातून त्या डब्यात फिरणारा आणि "चाय गर्रम' अशी विशिष्ट लयीत आर्जवी हाळी मारणारा चहावाला, तुम्हाला चहा पिण्यास हमखास उद्युक्त करतो. याउलट विमानातली मेकअपचा थर लावलेली हवाई सुंदरी, विविध खाद्य आणि पेयांनी भरलेली ट्रॉली ढकलत "विल यू हॅव फ्रेश ज्यूस सर', अशी नाजुक, किणकिणत्या आवाजात विचारणा करते. पण तिच्या ट्रॉलीतून काहीही घेण्याची इच्छा मात्र होत नाही. आकाशातून प्रवास करत असलो तरी काय झालं, दहा रुपयांचा चहा पन्नास रुपयांना किंवा जमिनीवर कॅन केलेला ज्यूस, तिप्पट, चौपट किंमतीत कोण घेणार? काही सराईत विमानप्रवासी मात्र हवाई सुंदरीचा ओढून ताणून केलेला आर्जवी चेहरा पाहून, तुम्ही पुरुष असलात तर लगेच पाघळता आणि "दुधाची ताकावर' म्हणत शे-दीडशे रुपयांचा ज्यूस घशाखाली ढकलता. पुन्हा एकदा कृत्रिम हास्य करत ती हवाई सुंदरी पुढच्या प्रवाशावर आपलं मोहजाल पसरवण्याचा प्रयत्न करते. रेल्वेत दोन प्रकारचा चहा मिळतो. पहिला "डिप डिप'वाला आणि दुसरा उकळलेला. कुणाला पहिल्या प्रकारचा तर कुणाला दुसऱ्या प्रकारचा चहा आवडतो. ज्याची त्याची आवड!
हिमालयन वुड आऊल
हे सर्व रेल्वे आणि विमानपुराण सांगायचं कारण म्हणजे, आमच्या "अनरजिस्टर्ड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' ग्रुपच्या सदस्यांनी उत्तराखंडची "बर्ड फोटोग्राफी टूर' आयोजित केली. आमच्या क्लबचे सदस्य जेमतेम दोन हातांच्या बोटावर मोजण्याइतके. यावेळी जाणारे मात्र आम्ही अवघे पाचजण होतो. माझ्यासह सौ. अमृता आणि कुमार जोगळेकर हे दाम्पत्य आणि चारुदत्त देशपांडे, असे आम्ही चौघे पुण्याचे आणि पुरुषोत्तम पाटील हा मुंबईचा. तो आम्हाला मुंबई सेंट्रलवर जॉईन होणार होता. आम्ही सर्वजण निवृत्त असल्यामुळे रजांचा वगैरे काही प्रश्न नव्हता. पुण्यातून तिकिटं मिळण्याची शक्यता नसल्यानं, मुंबईहून तिकिटं काढण्याचं ठरलं. मे अखेरीस कार्यक्रम ठरला आणि मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते काठगोदाम अशी जाण्या-येण्याची तिकिटंही कन्फर्म झाली. यासाठी चारुदत्त देशपांडे यांचं कौतुक करावं तितकं थोडं. केवळ 15 दिवस आधी कन्फर्म तिकिटं काढण्याची त्यांनी किमया केली.

हजरत निजामुद्दिनपर्यंतचा प्रवास ठाकठीक झाला...आणि मग सुरू झाली ती आमच्या प्रवासाची चित्तरकथा.
ग्रे बिंग्ड ब्लॅकबर्ड

जून हा पावसाळ्याचा महिना. हिमालयातल्या पावसानं सळो की पळो केलं असतं. वेदर फोरकास्टची चार-पाच साईट पाहिली. जून अखेरीशिवाय उत्तराखंडमध्ये पाऊस येणार नसल्याचा निर्वाळा बहुतेक वेबसाईटनी दिला होता. अर्थात हिमालयात कोणत्याही वेळी काहीही घडू शकतं, याचा अनुभव होताच आणि तिथं असताना आम्हालाही आलाच. पुण्याहून गाडी करून आम्ही 11 वाजताच निघालो. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो, तर गाडी चुकायची भीती होती. ऑगस्ट क्रांती ही आमची गाडी संध्याकाळी ठीक 5.40 ला सुटली आणि दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दिनला पोचलो. तिथून टॅक्सी करून काठगोदामकडे जाणारी गाडी पकडायला जुनी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणं आवश्यक होतं. टॅक्सीवाल्याशी हुज्जत घालून आम्ही स्टेशनला पोचलो. पण सहाशेऐवजी पाचशे रुपयांत ठरवलेला सौदा आम्हाला महागातच पडला. त्यानं आम्हाला विरुद्ध म्हणजे स्टेशनच्या मागच्या भागात सोडलं. एकूण 18 प्लॅटफॉर्म ओलांडून आम्ही मुख्य प्रवेशद्वाराशी आलो. तिथूनच आमची गाडी सुटणार होती.
ब्लू थ्रोटेड ब्लू फ्लायकॅचर

ही गाडी काही वातानुकूलित नव्हती. गाडी खच्चून भरली होती. आता आठ तास अशा गर्दीतून प्रवास करावा लागणार होता. तरीही हरकत नव्हती. एक्स्प्रेस असलेली ही उत्तर संपर्क गाडी, अक्षरशः प्रत्येक स्थानकाशी संपर्क साधत चालली होती. काही ठिकाणी तर दोन स्थानकांच्या मध्ये थांबून शेतकऱ्यांशीही संपर्क साधण्याचा तिचा प्रयत्न होता. पहिल्या दीड तासांतच आम्ही कंटाळलो. पण आमच्या कंटाळ्याला न जुमानता गाडी आपल्याच नादात कूर्मगतीनं चालत होती. ही एक्स्प्रेस आहे की प्यासिंजर, यावर चर्चा करतच आम्ही काठगोदामला पोचलो. त्यावेळी रात्रीचे सव्वाबारा झाले होते. म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशीर!

इतक्या रात्री रिक्षा मिळणार का आणि हॉटेल तरी मिळणार का, याबद्दल आम्ही साशंक होतो. चालत स्टेशनबाहेर मुख्य रस्त्यावर आलो. समोरच एक हॉटेल दिसलं. तिथली खोली म्हणजे आमच्या बजेटमध्ये न बसणारं प्रकरण होतं. बाहेर आल्यानंतर थोड्याच वेळात एक देवासारखा रिक्षावाला आला. त्याच्यासोबत आम्ही आठ किलोमीटरवरील हलद्वानीला गेलो. हॉटेल ठरवलं. 1200 रुपयांत वातानुकूलित खोली होती. डबल बेडच्या दोन आणि सिंगल एक, अशा तीन खोल्या ठरवून परतलो. जाताना दुसरी एक रिक्षा घेतली. दोन्ही रिक्षामधून पुन्हा हलद्वानीला आलो. हॉटेलात येण्यापूर्वी खाऊन घेतलं. रमजान चालू असल्यानं, काही ठिकाणची हॉटेलं चालू होती, हे आमचं नशीब. रिक्षावालेही न कुरकुरता थांबून राहिले.
ग्रीन बॅक्ड टिट

दुसऱ्या दिवशी एक जीप करून आम्ही नैनितालकडे निघालो. नेहमीच्या रस्त्याऐवजी भीमतालच्या रस्त्यानं नैनिताल जवळ पडतं, असं जीपवाल्याचं म्हणणं पडलं. आम्हाला खरंतर नैनितालला जायचंच नव्हतं. आठ किलोमीटर अलिकडे आणि भीमतालपासून जवळच असलेल्या मेहरा गावात आमचं "होम स्टे' बुक झालं होतं. देशपांडे यांच्या एका फेसबुक फ्रेंडनं, हरी लामा यानं त्याच दिवशी सकाळी एक पोस्ट टाकली होती. आपण नव्यानंच होम स्टे सुरू केल्याचं त्यात म्हटलं होतं. राहण्याचं बुकिंग पोचण्यापूर्वीच झालं. खोल्याही चांगल्या होत्या. "फोर्कटेल नेस्ट', असं या हॉटेलचं नाव. रस्त्याला लागूनच आहे ते. मला उत्कटतेनं जिथं जायची इच्छा होती, त्या साततालचा रस्ता आमच्या हॉटेलसमोरूनच जात होता. शेजारीच एक छोटेखानी हॉटेल होतं. तिथलं जेवण खरोखरीच चांगलं होतं. लामा यानं आमच्यासाठी एका जीपचीही व्यवस्था करून ठेवली होती. हरीश जोशी हे त्याचं नाव. तो राहणारा पंगोटचा होता. रोज पहाटे आमच्यासाठी 30-35 किलोमीटरवरून तो यायचा. गाडीचं भाडं होतं रोजचं 2500 रुपये. तो स्वतः पक्षी निरीक्षकांबरोबरच फिरत असल्यानं, त्याला पक्ष्यांची खूप माहिती होती. हा गाईड कम ड्रायव्हर, पुढचे सहा दिवस आम्हाला फिरवत होता. थांब म्हटलं की थांबत होता. त्याला आमच्यापेक्षा जास्त पक्षी दिसत. त्याला जागा माहित होत्या. आम्हाला अपवाद वगळता सर्वच पक्षी नवीन होते. त्यांची नावंही माहित नव्हती. तो नावांसकट माहिती द्यायचा.
रेड बिल्ड लिओथ्रिक्स

पहिला दिवस वाया जाऊ नये म्हणून आम्ही लगोलग सातताल गाठला. पूर्वी इथं एकूण सात ताल म्हणजे तलाव होते. आता त्यातले फक्त चार उरलेत. अशाच एका सुकलेल्या तालशेजारी, आम्ही बैठक मारली. हे वातावरण हुबेहूब सिंहगड व्हॅलीसारखं होतं. सुदैवानं आम्ही आलो तेव्हा इथं फारसे फोटोग्राफर्स नव्हते. या जागेला स्थानिक फोटोग्राफर्स 'स्टुडिओ' म्हणतात. खरंच अगदी सार्थ नाव पडलंय. भल्या मोठ्या निसर्गाच्या कॅनव्हासवर लहान-मोठ्या पक्ष्यांची जत्राच भरली होती. पुण्यात ज्या व्हर्डिटर फ्लायकॅचरसाठी धावपळ करायला लागायची, ते इथं मुक्तछंदात विहरत होते.त्याशिवाय स्ट्रेटेड लाफिंग थ्रश, स्मॉल निलतवा, अॅशी बुलबुल, अल्ट्रामरीन फ्लायकॅचर, ग्रे हेडेड कॅनरी फ्लायकॅचर, ऑरेंज हेडेड ग्राऊंड थ्रश, ग्रे हेडेड वुडपेकर, रूफस बेलीड वुडपेकर, मरून ओरिओल, रेड बिल्ड ब्लू मॅगपाय, रेड बिल्ड लिओथ्रिक्स, ब्लू थ्रोटेड बार्बेट, ओरिएंटल व्हाईट आय ही मंडळी दिसली. आपल्या इथे व्हिसलिंग थ्रश हे पक्षी खूप कमी दिसतात. इथं तर ब्लू व्हिसलिंग थ्रशची संख्या कावळ्यांएवढी होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 जूनला आमची खरी "बर्ड फोटोग्राफी टूर' सुरू झाली.
हिमालयन रुफस बेलीड वुडपेकर

साततालचं आकर्षण असलं तरी ते जवळच असल्यानं कधीही जाता येईल, असं हरीशचं म्हणणं पडलं. त्याच्या आराखड्यानुसार प्रथम आम्ही गागर गावाच्या दिशेनं निघालो. याच रस्त्यावर महेशखान हे दाट पाईनचं अभयारण्य लागलं. भवालीमार्गे मेहरापासून ते 16 किलोमीटरवर आहे. या रस्त्यावर सकाळी सकाळी आम्हाला स्ट्रीक्ड लाफिंग थ्रश, ग्रे हेडेड वुडपेकर, ब्लॅक हेडेड जय आणि ग्रे हूडेड बॅबलर हे पक्षी दिसले. महेशखान अभयारण्यात जाण्याची परवानगी आमच्याकडे नव्हती. तिथला गार्ड आम्हाला सोडत नव्हता. आम्ही त्याला खूप विनवण्या केल्या, पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. वनखात्याच्या नियमांशी तो बांधिल होता. अचानक अधिकारी आल्यास त्याच्या नोकरीवरही संक्रांत येऊ शकत होती. आमची विनवणी चालू असतानाच तिथं एक गाडी येऊन थांबली. त्यातून काही महिला व पुरूष बाहेर पडले. हे सर्वजण कदाचित आमच्या मोठ्या मोठ्या लेन्सेस लावलेल्या कॅमेऱ्यांकडे पाहूनच थांबले असावेत. ही मंडळी चंडीगडची होती. सर्व ज्येष्ठ नागरिकांना पाहून त्यांनीही गार्डची समजूत काढली आणि 100 रुपयांची पावती फाडून आम्ही वाहनासकट अभयारण्यात शिरलो.
ग्रेट बार्बेट
पाईन वृक्षांचं हे जंगल खूपच छान आहे. अर्थात हिमालय असल्यामुळं सह्याद्रीसारखी डोंगरभ्रमंती करणं खूपच अवघड आहे. इथं ग्रे बिंग्ड ब्लॅक बर्ड, रूफस सिबिया, चेस्टनट बेलीड वुडपेकर, ओरिएंटल टर्टल डव्ह हे पक्षीगण दिसले. या अभयारण्याच्या मधोमध वनखात्याचं रेस्ट हाऊस आहे. नैनितालमध्ये त्याचं बुकिंग करून तिथं राहता येतं. जंगलात राहण्याचा अनुभव अत्यंत अनोखा असतो. आम्हाला काही ती संधी मिळाली नाही. तिथून आम्ही गागरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. आपल्या इथं दिसणाऱ्या गोल्डन ओरिओलसारखाच इथं मरून ओरिओल आहे. तो दिसला पण त्याचे फोटो काही घेता आले नाहीत. गागरच्या वाटेवरही खूप पक्षी मिळाले. खुद्द गागरमध्ये चहा आणि नाष्ता घेतला. पक्ष्यांची संख्याही इथं खूप होती. ब्लॅक हेडेड सिबिया आम्हाला इथंच मिळाला.

आम्हाला आता हवा होता कुठलाही फीझंट. हिमालयात हे पक्षी मुबलक प्रमाणात आढळतात. किंबहुना ते इथंच सापडतात. पुढच्याच दिवशी पहाटे निघायचं ठरलं, पण आवरून होईपर्यंत उशीर झालाच. फीझंट पहाटेच्या सुमारास रस्त्यावरही दिसतात. नंतर वाहतुकीची वर्दळ वाढते आणि ते पुन्हा झाडीत निघून जातात. आम्ही पंगोटचा रस्ता धरला. हा परिसरही पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. उशीर झाला असला, तरी नैनिताल येण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला एक खलीज फीझंट दिसला. तो चरत होता नेमका वळणावर. हातात पॉईंट अँड शूट कॅमेरा होता. त्यानंच एक-दोन फोटो घेतले. आणखीही मिळाले असते, पण समोरून एक गाडी आल्यामुळं तो डोंगर उतारावरून निघून गेला. एवीतेवी उशीर झालेलाच होता म्हणून नैनितालमध्ये चहा आणि नाष्ता घेतला आणि पंगोटच्या दिशेनं निघालो. रस्त्यात पक्षीजत्रा होतीच. हिमाच्छादित शिखरं दिसणाऱ्या एका पॉईंटवर आलो. धुक्यामुळं शिखरं काही दिसली नाहीत. पण तिथं बरेच पक्षी मिळाले. काही वेळ तिथं काढून पुन्हा पंगोटचा रस्ता धरला. उतारावरून खाली पंगोट दिसत होतं. ते पाहात असतानाच हरीशनं गाडी थांबवली. तिथं एक ग्रे विंग्ड ब्लॅकबर्ड छान पोझ देत होता. आम्ही सहाजण समोर आल्यानंतर तो जणू फ्रीझ झाला. त्याचे छान फोटो मिळाले. आणखीही बरेच पक्षी तिथं होते.
ग्रेटर यलो नेप्ड वुडपेकर

उतारावरून जात असताना हरीशनं पुन्हा गाडी थांबवली. आम्हीही बारकाईनं पाहू लागलो. बरेच पक्षी गोंगाट करत होते. तिथं सध्या ब्राऊन वुड आऊलचं वास्तव्य असल्याचं त्यानं सांगितलं. झाडीतून तो दिसत होता खरा, पण फोटो काही नीट घेता येत नव्हते. उतारावरून खाली गेलं असतं तर तो नक्कीच मिळाला असता. हरीशनं अपेक्षेनं आमच्याकडे पाहिलं. खाली उतरायला कोणीच तयार नव्हतं. मी मनाचा हिय्या केला आणि त्याच्यासोबत खाली गेलो. एका पाईनच्या झाडाचा आडोसा घेतला आणि त्याचे मस्त फोटो काढले. हे घुबड आकारानं मोठं असलं, तरी ते पिलू होतं. या घुबडांचे डोळे वैशिष्ट्यपूर्ण असतात. घुबडांचे डोळे माणूस किंवा माकडांसारखे पुढे असतात. हे वुड आऊल एखाद्या लंगूरसारखेच दिसतात.

पंगोटमध्ये पोचल्यानंतर पाऊस सुरू झाला. आमची वेळ कदाचित चुकली होती. वेदर फोरकास्ट चुकीचा ठरला. नेहमीच्या मार्गानं येणारा पाऊस यावेळी खुष्कीच्या मार्गानं, म्हणजे बिहारच्या बाजूनं आला होता. याचाच अर्थ आमचा अंदाज चुकला होता. पाऊस थांबल्यानंतर आम्ही पंगोटमधील एका प्रसिद्ध हॉटेलात गेलो. या हॉटेल मालकानं पक्ष्यांसाठी खास सोय केली होती. पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी जमिनीत खड्डे करून पाणी सोडलं होतं. इथं बऱ्याच जातींचे पक्षी येतात. माणसांच्या सान्निध्याचा त्यांना त्रास होत नाही. 'कफल हाऊस' असं या हॉटेलचं नाव आहे. मालक राजेंद्र जोशी काही भेटले नाहीत, पण त्यांचा व्यवस्थापक भेटला. त्यानं बिनधास्त फोटो काढा असं सांगितलं. इथं येणाऱ्या पक्ष्यांपैकी आम्हाला आकर्षण होतं, ते रेड बिल्ड ब्लू मॅगपाय या मोठ्या पक्ष्याचं. लांबलचक शेपटीमुळं, लाल चोचीमुळं आणि निळ्या-पांढऱ्या रंगांमुळं त्याचं देखणेपण वाढतं. मी ४०० मिमीची प्राईम लेन्स लावल्यामुळे मला काही त्याचे पूर्ण आकारातील फोटो घेता येणं शक्य झालं नाही. ही कसर मी नंतर चाफीमध्ये भरून काढली. तिथं एका हॉटेलच्या मागे आठ-दहा मॅगपाय बागडत होते. ब्लॅक हेडेड जय तर ठायी ठायी दिसत होते.
ब्लू विंग्ड सिवा
पंगोट यशस्वी झालं. त्या दिवशी रात्री मेहराला परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साततालचा कार्यक्रम ठरवला. दुपारनंतर क्रेस्टेड किंगफिशरच्या मागावर पुन्हा चाफीला गेलो. तो काही मिळाला नाही, पण ब्राऊन डिपर आणि प्लंबियस रेडस्टार्ट मिळाले. आमच्याकडे नसलेले सुमारे ३७ प्रकारचे पक्षी आम्ही कॅमेऱ्यात टिपले होते. पहिलीच सफर यशस्वी ठरली होती. आता परतीचे वेध लागले होते. २४ तारखेला काठगोदामहून गाडी होती. २३ जूनलाच आम्ही हलद्वानीत आलो. तिथल्या नानक हॉटेलमध्ये राहिलो. त्याचे मालक श्री. गुप्ता यांच्या मुली शिकण्यासाठी पुण्यातच आहेत. त्यांनी खूप मदत केली. समोरच त्यांचं त्याच नावाचं रेस्टॉरंटही आहे. तिथं जेवण खूपच छान मिळतं. पुण्याहून आलेल्या पाहुण्यांचं त्यांना कौतुक असावं, असं दिसत होतं. २४ तारखेला सकाळी आमचा पुन्हा काठगोदाम-दिल्ली आणि दिल्ली-पुणे असा प्रवास सुरू झाला.

Comments

Popular posts from this blog

अशाच एका 'रम्य' सकाळी...