काटवनांतले पक्षी - मयुरेश्वर अभयारण्य
![]() |
शॉर्ट टोड ईगल |
पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटरवर सुपे गावाजवळ हे काटवन आहे. सोलापूर महामार्गावरील यवतच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर उजवीकडे एक फाटा फुटतो. त्याशिवाय चौफुल्यावरून आणि दिवे घाटातूनही इथं येता येतं. खेड शिवापूरहूनही इथं येता येतं. दिवे घाटातून जेजुरीला यायचं आणि गावातूनच मोरगावच्या दिशेनं वळायचं. सुपे गावाबाहेरील रस्त्यावरच वनखात्याची कमान दिसते. या कमानीतून थोडं आत गेल्यानंतर वन खात्याचं कार्यालय लागतं. तिथं नोंद करून आणि आत फिरण्यासाठी असलेलं शुल्क भरल्यावर मयुरेश्वर अभयारण्यात फिरता येतं.
![]() |
सदर्न ग्रे श्राईक |
अभयारण्यात शिरताच बाभळीची आणि थोडं पुढं गेल्यास चन्या-मन्या बोरांची खुरटी झाडं सुरू होतात. अभयारण्यात फिरण्यासाठी सर्वत्र मातीचे रस्ते आहेत. वन्य जीवन पाहण्यासाठी दोन वॉच टॉवरही आहेत. आत शिरताच वाहनाची गती मंदच ठेवावी. चिंकारा हरणं खूपच लाजाळू असतात. वाहनांची त्यांना सवय आहे म्हणून शक्यतो वाहनात बसूनच त्यांना पाहावे. छोट्या छोट्या कळपांनी ही हरणं फिरत असतात. काटवनांचं स्वरूप पाहता, ती जगतात कशी, याचं आश्चर्य वाटतं. पूर्णपणे मुरमाड जमीन असल्यामुळं गवत जवळजवळ नसतंच आणि जे असतं ते वाळलेलं असतं. परिणामी ही हरणं हिरव्या चाऱ्यासाठी आसपासच्या शेतात शिरतात. पिकांची नासाडी होत असल्यानं, त्यांची शिकारही असावी. पण त्याबाबत कोणीच काही बोलत नाहीत. सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी इथं किमान २५० चिंकारा हरणं होती. आता मात्र चाळीस-पन्नासच असावीत, असा अंदाज आहे.
![]() |
युरेशिअन कॉलर्ड डव्ह |
माळरानांतच कायम वास्तव्य असलेले चेस्टनट बेलीड सँडग्रूज (पखुर्डी) इथं हमखास पाहायला मिळतात. मात्र इथल्या मातीशी ते इतके एकरूप झालेले असतात, की त्यांचं बसण्याचं ठिकाण माहिती असणाऱ्यालाच ते हमखास दिसतात. जमिनीच्या मातकट रंगाशी कॅमोफ्लेज झालेले हे पक्षी, किंचितही चाहून लागल्यास भुर्रकन उडून जातात आणि तेव्हा लक्षात येतं, की इथं एक-दोन नाही, तर १५-२० पक्ष्यांचा थवाच होता. मला त्यांच्या दोन-तीन जागा माहिती असल्यानं, मी नेमका त्या ठिकाणी जातो. माझ्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना आश्चर्य वाटतं, पण ते माझं 'सीक्रेट' आहे. या लाजऱ्या-बुजऱ्या पक्ष्यांची मी अगदी जवळून छायाचित्रं काढली आहेत. त्यांची आणि माझी ओळख आता जणू पक्की झाली असावी.
![]() |
लार्ज ग्रे बॅबलर |
या काटवनात लिटल ब्राऊन डव्ह (होला), स्पॉटेड डव्ह (ठिपक्या होला) आणि युरेशिअन कॉलर्ड डव्ह (पठाणी होला) यांच्याशिवाय रेड कॉलर्ड डव्ह (तांबी होला) ही कबुतरंही दिसतात. पहिले तीन सर्वत्र दिसतात, मात्र, तांबी होला हे इथलं विशेष म्हणता येईल. अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच तिठ्यावरून उजवीकडं वळल्यानंतर आपण वनखात्यानं तयार केलेल्या एका पाणवठ्यावर येतो. सकाळच्या वेळी इथं आल्यास अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. त्यात व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या), इंडियन सिल्व्हरबिल (शुभ्रकंठी मनोली), लिटल ग्रीन बी ईटर (वेडा राघू), ब्लॅक ड्राँगो (कोतवाल), पर्पल सनबर्ड (शिंजीर), सदर्न ग्रे श्राईक (राखी खाटीक), लाँग टेल श्राईक (नकल्या खाटीक), बे बॅक्ड श्राईक (छोटा खाटीक), ग्रे फँकोलिन (चित्तूर किंवा तित्तीर), लार्ज ग्रे बॅबलर (सातभाई), जंगल बॅबलर (रानभाई), ब्राह्मणी स्टारलिंग (ब्राह्मणी मैना), स्कारलेट मिनिव्हेट (निखार) हे पक्षी दिसतात. हिवाळ्यात इथं ग्रे नेक्ड बंटिंग (करड्या मानेचा भारीट) आणि युरेशियन रायनेक (मानमोड्या) हे स्थलांतरित पक्षीही दिसतात.
![]() |
चिंकारा |
माळरानं आणि काटवनांत पक्ष्यांची संख्या तुलनेनं जास्त असते. परंतु, ही वनं आणि रानं आता कमी होऊ लागल्यामुळं, या पक्ष्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. निसर्गचक्राचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे, ही भावना अंगी रुजवल्यास, त्यांचं संरक्षण आणि वर्धन करता येणं शक्य आहे.
Comments
Post a Comment