...आणि अनुभवले थरारक क्षण!

(कथा रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील शिकारीची)


सोयी-सुविधांची उपलब्धता जशी वाढत जाते, तशी माणसाची सुखाची व्याख्या बदलत जाते. आता हेच पाहा ना, सुमारे ४० वर्षांपूर्वीची धुरांच्या रेषा हवेत सोडत झुकझुक करत जाणारी आगीनगाडी जाऊन 'भों' करत चालणारी वाऱ्याशी स्पर्धा करत डिझेल इंधनावर धावणारी रेल्वे आली. पूर्वी केवळ 'फर्स्ट क्लास' हाच 'एअर कंडिशण्ड' होता, आता दुसऱ्या वर्गालाही ती सुविधा मिळाली आहे. पण गाडीतून फिरण्याची त्या वेळची मजा काही आता उरलेली नाही. कोळशानं काळेमिट्ट झालेले चेहरे आणि कपडे धुवून आया काकुळतीला येत. आता दोन हजार किलोमीटरच्या प्रवासानंतरही लोक ताजेतवाने असतात. हा काळाचा महिमा आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की अस्मादिक आपल्या सात इष्टमित्रांसह इतरवेळी सूर्याच्या धगीनं होरपळून निघणाऱ्या, पण केवळ याच दिवसांत शीतल असणाऱ्या राजस्थानातील रणथंभोरच्या अभयारण्याकडे निघालो होतो.

आमचे मित्र चारूदत्त देशपांडे यांनी यापूर्वी चार-पाच वेळा रणथंभोरला भेट दिल्यामुळे, आमच्या आठ जणांच्या टीमचं नेतृत्त्व ओघानंच त्यांच्याकडे आलं. रेल्वे तिकिटाचं बुकिंग, रणथंभोरमधील हॉटेल आणि अभयारण्यातील जिप्सीच्या चार सफारींचं बुकिंगही त्यांनी नेहमीच्या सफाईनं दोन महिन्यांपूर्वीच केलं होतं. अखेर दहा फेब्रुवारीला, म्हणजे अस्मादिकांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आमचा चमू पुणे-जयपूर गाडीत स्थानापन्न झाला. अरे हो, आमच्या चमूची ओळख करून द्यायची राहिलीच. सर्वांत ज्येष्ठ आहेत कुमार जोगळेकर, त्यांची पत्नी सौ. अमृता, मुंबईहून आलेला पुरुषोत्तम पाटील, अस्मादिक, मिलिंद अनगळ आणि त्यांची पत्नी सौ. कांचन, चारुदत्त देशपांडे आणि सर्वांत तरुण सचिन जाधव.

जाण्यापूर्वी आमच्या हलवायाकडून थोडं च्याऊ-म्याऊ घेतलं होतंच. आजच्या दिवसाचं सेलिब्रेशन म्हणून तोंड गोड करण्यासाठी मलईदार पेढेही घेतले होते. पण संध्याकाळी सर्वांनी चक्क आश्र्चर्याचा धक्का दिला. त्यांनी माँजिनीसचा केकच आणला होता. योग्य वेळी रीतसर केक कापून अस्मादिकांचा वाढदिवस साजरा झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन सदुसष्टावा की अडुसष्टावा असे मतभेद आमच्यात नेहमीच होत असत, तसाच आताही अस्मादिकांचा वाढदिवस त्रेसष्टावा की चौसष्टावा हे काही सांगता येत नाही. पण चौसष्टावं वर्ष चालू झालं हे निश्र्चित!

रणथंभोरला पोचल्यानंतर हॉटेलात टेकतो ना टेकतो तोच जेवण तयार असल्याची वर्दी आली. भराभर आवरून तयार झालो. दोन वाजता अभयारण्यातली पहिली सफारी होती, ताडोबासारखं इथं कसंही आणि कुठंही फिरता येत नाही. जवळजवळ १४०० चौरस किलोमीटर पसरलेल्या अभयारण्याच्या केवळ ३० टक्के भागात फिरण्याची परवानगी आहे. त्यातही दहा झोन केले आहेत. या झोनचं वाटप वन खात्याकडून होतं. पहिलीच सफारी चार क्रमांकाच्या झोनमध्ये होती. या झोनमध्ये एक तलाव असल्यानं आमचा उत्साह दुणावला होता. वाघ दिसला नाही तरी बेहत्तर, पक्ष्यांना काही तोटा नसणार!

तळपतं उन असलं तरी उकडत अजिबात नव्हतं. मुख्य गेटवर फॉर्म भरून दिल्यानंतर आम्ही अभयारण्यात
प्रवेश केला. दीड-दोन किलोमीटरवर दुसरा चेक नाका होता. इथून खरं अभयारण्य सुरू होत होतं. आवश्यक नोंदी करण्यासाठी आमच्या जिप्सीचा चालक आणि गाईड गेले होते. आम्ही उत्साहात होतो. एवढ्यात अगदी समोर एक रूफस ट्रीपाय (टकाचोर) हा पक्षी दिसला. लांब शेपटीमुळं त्याचं देखणेपण द्विगुणित होतं. सह्याद्रीच्या दऱया-खोऱ्यात त्याचं छायाचित्र टिपण्यासाठी कोण यातायात करावी लागते, याचा अनुभव आम्ही सर्वांनीच घेतला होता. इथं मात्र तो समोरच बसला होता. त्याच्यावर कॅमेरा रोखेपर्यंत आणखी दोन-चार ट्रीपाय तिथं आले आणि थोड्याच वेळात त्यांनी एकच कल्ला केला. हे पक्षी बिस्किटं खाण्यास सोकावले आहेत. पर्यटकांनीच त्यांना ती सवय लावली आहे.

सांबर, नीलगायी, चितळं, रानडुकरं असे प्राणी पाहात आम्ही एका प्रशस्त तळ्याजवळ आलो. तळ्यात हे सर्व प्राणी तर होतेच पण अनेक पक्षीही होते. तळ्याची शोभा पाहात असताना अचानक आमच्या चालकानं खाली बसण्याची सूचना केली आणि खडकाळ रानवाटांवरून जिप्सी सुसाट चालवत इच्छित स्थळी नेली. आणि तिथं ती होती...टी-19 कृष्णा नावाच्या वाघिणीच्या दोन बछड्यांपैकी एक पूर्ण वाढीची आणि स्वतंत्र झालेली दोन वर्षे वयाची वाघीण! तिला मनसोक्त पाहिलं आणि मनसोक्त छायाचित्रंही काढली. पहिल्याच दिवशी हा लाभ झाला होता. वाघ दिसला म्हणजे सर्व काही संपलं असं समजणाऱ्यांपैकी आम्ही नाही. अभयारण्यातला प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती पाहण्याचा आमचा परिपाठ. वाघिणीला पाहून आम्ही तिथं थांबलेल्या गाड्यांची वर्दळ नको म्हणून जरा लवकरच तिथून निघालो. परत फिरण्याची वेळ जवळ आली होती. तळ्यावर पुन्हा एक फेरी मारण्याचा आमचा विचार होता. अगदी तळ्याजवळ पोचलो देखिल आणि तेवढ्यात चालक पुन्हा सूचना देऊन सुसाट सुटला आणि आम्हाला थेट कृष्णा वाघिणीच्या दुसऱ्या बछड्यापुढंच उभं केलं. हा वाघ होता आणि शिकारीच्या बेतात होता. एक चितळ त्यानं हेरलं होतं. सावधपणे तो त्याचा पाठलाग करत होता, पण चितळानं हुलकावणी दिली. पहिल्याच दिवशी आम्हाला दोन वाघांचा लाभ झाला होता. परतीच्या मार्गावरच रस्त्यावरच एक अस्वल झाडं हुंगत फिरत होतं. आमची चाहूल लागताच ते झाडीत पळालं. चालकानं गाडी रिव्हर्समध्ये घेतली आणि एका रस्त्यावर तो जाताना दिसला. पण त्याचा केवळ पार्श्वभागच आम्हाला घेता आला. हेही नसे थोडके!

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच आम्ही जिप्सीत स्वार झालो. मनात हुरहुर दाटली होती. आज आम्हाला
झोन ८ मिळाला होता. हा झोन तसा रुक्षच मानला जातो पण कृष्णा वाघीण आणि तिचे दोन अगदी लहान बछडे याच झोनमध्ये आहेत. तिसरा वाघ दिसण्याची शक्यता होती. काही वेळ फिरूनही तिचा काही मागमूस लागत नव्हता. शेवटी कंटाळून आम्ही अभयारण्यातील एका उत्तुंग शिखरावर गेलो. तिथपर्यंतचा रस्ता अत्यंत खडकाळ आणि उबडखाबड होता. डोंगरमाथ्यावरील पर्णरहित झाडांवर अनेक प्लम हेडेड पॅराकीट होते. आम्हाला जवळून छायाचित्रं घेता यावीत म्हणून चालकानं जिप्सी पुढं नेली आणि धडाड् असा आवाज झाला. त्यानं गाडी नेमकी खडकाच्या एका नैसर्गिक पायरीवरून उतरवली आणि व्हायचं तेच झालं. गाडी खडकात अडकली. चालकानं कशीबशी ती काढली. आम्हाला चांगली छायाचित्रं मिळाली आणि आम्ही कड्याकडे गेलो. तिथून रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग आणि खालचं सवाई माधोपूरचं विहंगम दृश्य दिसत होतं.

जिप्सी चालक आणि गाईडला कॉल कसा मिळतो, तेच समजत नाही. पण जेमतेम मिनिटभर थांबलो आणि त्यानं भराभर गाडीत बसण्याचा हुकूम सोडत गाडी तुफान सोडली. डोंगरातील अतिशय खडकाळ रस्त्यावरून त्यानं अशा काही बेफामपणे गाडी काढली, की आम्हाला ग्रेट हिमालयन रॅलीचीच आठवण झाली. डोंगरावरून अवघ्या तीन मिनिटांत त्यानं गाडी योग्य स्थळी आणली. कृष्णा वाघिणीनं आदल्या रात्री सांबराची शिकार केली होती आणि ती बछड्यांसह तिथंच होती. बराच वेळ थांबूनही दाट झाडीमुळे आम्हाला काही तिनं दर्शन दिलं नाही. निराश होऊन आम्ही परतलो. परतताना मात्र अनेक वर्षांनंतर आम्हाला ग्रेट थिक नी (पिकविक) या पक्ष्याची छायाचित्रं मिळाली आणि आमच्या दिवसाचं सार्थक झालं.

त्याच दिवशी दुपारी आम्हाल पु्न्हा झोन चारमध्ये जाण्याची संधी मिळाली. पुन्हा त्याच दोन वाघांना पाहण्यात
काही स्वारस्य नव्हतं. म्हणून आम्ही पक्ष्यांचा वेध घेत हळूहळू जात होतो. पुन्हा चालकानं बसण्याची सूचना केली आणि गाडी सुसाट सोडली. वाघ दिसल्याचा कॉल आल्यावर ही मंडळी कुणाचं काही न ऐकता थेट वाघाच्या पुढ्यातच जाऊन थांबतात. आम्ही तिथं पोचेपर्यंत काही जिप्सी आणि कँटर गाड्यांमधून अनेक परदेशी प्रवासी थडकले होते. पहिल्या दिवशी दिसलेली ती वाघिणच होती. आळसावली होती बिचारी. कूस बदलत आपले धारदार आणि जीवघेणे सुळे दाखवत जांभया देत होती. मधूनच आमच्याकडे तुच्छतेनं पाहात होती. पहिल्या जागेचा कंटाळा आला असावा म्हणून ती उठली आणि थोडं पुढं येऊन आमच्या पुढ्यातच ठाण मांडलं. मध्येच नाक उंचावून शिकारीचा माग घेत होती. कान शिकारीचा वेध घेत होते. माणसांचा गंध तिला लहानपणापासून परिचित आहे, त्या गंधातूनच ती आपल्या शिकारीचा वेध घेत होती. अचानक ती उठली आणि सावधपणे दबक्या पावलांनी पुढं जाऊ लागली. आमचे कॅमेरे क्लिकक्लिकाट करत होतेच. अचानक आमच्या मागे सांबरानं 'भाँक' असं जोरात ओरडून सावधानतेचा इशारा दिला. तोपर्यंत आमची वाघिण तीरासारखी सुटली होती. सांबरानं इशारा दिल्यानंतर संपूर्ण कळप पर्यटकांच्या वाहनांच्या मागच्या टेकडीकडे धावला आणि तिथंच थांबून वाघिणीच्या चालीचा पुढील अंदाज बांधू लागला. संपूर्ण कळप एका दिशेनं धावला असला, तरी एक पाडस मात्र नेमक्या उलट्या दिशेनं तळ्याकडे धावलं. हाच घातक्षण होता. तीन-चार झेपेत वाघिणीनं या पाडसाच्या नरडीचा घोट घेतला! पाडसाच्या गळ्यावर आवळलेला जबडा तिनं उघडला नाही. पाडस मरणांतिक आचके देत होतं. मग तिनं पाडसाच्या गळ्यालाच धरून शिकार सुरक्षित ठिकाणी घेऊन निघाली. पाडसानं दोन-तीन आचके दिले आणि तो प्रतिकाराच्या पलिकडे गेला. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक किंवा अॅनिमल प्लानेटवर पाहिलेले थरारक क्षण आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. आयुष्यातला अत्युच्च क्षण आम्ही जगलो होतो!

कोणत्याही व्याघ्र प्रकल्पात वाहनांतून फिरणाऱ्या लोकांची वाघांना ओळख असते. हे आपलं खाद्य नाही, हे त्यांच्या आईनं त्यांच्या मनावर ठसवलेलं असतं. गाडीतून कोणी खाली उतरलं, तर त्याची काही धडगत नसते. वाघांचं भक्ष्य असलेली सांबरं, चितळं अशा गाड्यांच्या आसपास सावधपणे आश्रय घेतात. वाघही या गाड्यांच्या आश्रयाला असतो. जेव्हा वाहनं असतात तेव्हा शिकार आणि शिकारी आमनेसामने असतात. दोघांनाही माणसांचा आधार वाटतो पण वाघही त्यातूनच संधी साधत असतो. सांबराचं पाडस गेल्याचं दुःख वाटलं पण जंगलचा हाच तर कायदा असतो. इतक्या वेळा वाघ पाहिले पण शिकार पाहण्याचा योग पहिल्यांदाच आला आणि पुन्हा हाच झोन मिळाल्याचा आनंद शतगुणित झाला. पुन्हा एकदा तळ्याच्या दुसऱ्या भागात काही वेळ काढला. तिथं रूफस ट्रीपायला अस्मादिकांनी हातावर बसवून बिस्किटं खायला घातली.

आमचं पूर्ण समाधान झालं होतं. म्हणूनच तिसऱ्या दिवशी कोणताही झोन मिळाला तरी चालला असता. मिळाला तो नेमका झोन दोन. हा झोन पक्षीमित्रांचा खास आवडीचा. याच झोनमध्ये विविध प्रकारचे पक्षी मिळाले. अनकॉमन असलेला कॉमन बॅबलरचा (छोटा सातभाई) थवा इथंच मिळाला. ओरिएंटल हनी बझर्ड (मोहोळ घार), क्रेस्टेड सर्पंट ईगल (पन्नगाद), ग्रे फ्रँकोलिन (तीतर) आणि इतरही अनेक पक्षी मिळाले. याच झोनमध्ये मुबलक वॉटरहोल्स आहेत. एक मोठा तलावही आहे. रणथंभोरच्या प्राचीन किल्लाही याच झोनमध्ये आहे. इथल्या गणेश मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पडीक असलेल्या या अवाढव्य पसरलेल्या या किल्ल्याच्या आश्रयानं बिबटे राहतात. अनेक गिधाडांची घरटी प्रामुख्यानं याच भागात आहेत. पक्षीमित्रांना हा झोन म्हणजे स्वर्ग वाटतो. इथंच एका ओढ्याकाठी एक मोर आपला अर्धवट वाढलेला पिसारा उघडून मादीची आर्जवं करत होता. रोझ रिंग्ड पॅराकीट (पोपट) आणि लार्ज ग्रे बॅबलर्स (सातभाई) तर अगदी जवळ येऊन जलप्राशन करत होते. ग्रेट टिट (राखी वल्गुली, टोपीवाला) तर चिमण्यांसारखे सारखे दिसत होते.

या ना त्या निमित्तानं रणथंभोरला भेट देण्याचं लांबणीवर पडत होतं. देशपांडे यांच्या आग्रहामुळेच हा योग जुळून आला आणि कल्पनेच्या पलिकडे यशस्वी झाला. आता इथल्या फेऱ्या वाढणार, हे लक्षात घेऊनच आम्ही पुन्हा जयपूर-पुणे एक्स्प्रेसचा आमचा टू टियरचा डबा गाठला आणि पुण्याकडे प्रस्थान ठेवलं.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

विहंगभूमी नैनिताल

अशाच एका 'रम्य' सकाळी...