नवजा धबधब्याच्या गमजा


 तीन ऋतुंमधला आवडता ऋतू कोणताय़ या प्रश्नाला उत्तर देणं खरंच अवघड आहे. आपल्या परीनं तीनही ऋतू चांगलेच असतात. अगदीच डावं-उजवं करायची वेळ आल्यास, आपल्यापैकी अनेकजण झट्कन पावसाळा हेच उत्तर देतील. पण उन्हाळाही महत्त्वाचा असतोच. उन्हाळाच नसेल, तर ढग कसे तयार होणार आणि ढग तयार झाले नाहीत, तर पाऊस कसा पडणार? काही लोकांना हिवाळा आवडतो. तो असतोच आवडण्यासारखा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कारणांमुळे एखादा विशिष्ट ऋतू आवडतो. आपल्याला तर बुवा सर्वच ऋतू आवडतात. पावसाळा विशेष आवडीचा एवढंच!


पावसाळा म्हणजे मनमुराद भटकंती करण्याची संधी. शहरांमधून जेव्हा लोक छत्र्या आणि रेनकोट घालून किंवा मोटारीच्या काचा लावून "काय हा पाऊस', असं म्हणत असतात, तेव्हा आमच्यासारखी भटकी मंडळी भर्राट वारा आणि पावसाच्या लाटा अंगावर घेत गिरी-कंदरांचा धांडोळा घेत फिरत असतात. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, चोहीकडे पसरलेलं हिरवंगार साम्राज्य, दुथडी भरून वाहणाऱया नद्या आणि गिरी शिखरावरून समुद्रसपाटीकडे खळाळत वाहणारे ओढे, चिंब भिजलेली धरणी, आभाळाला आणखी बरस अशी वारंवार विनवणी करत असते. निसर्गाच्या सान्निध्यात असताना आपोआप मन शब्द बदलून प्रार्थना करण्यास उत्सुक असतं.


धरणी हिरवट भारी तुजविण संसारी
सुसाट वारे संगे गुजगोष्टी करिती,
सागराच्या भेटी सरिता आली गे
प्रसन्न होउन घेई तृप्तीचा घास.

एखाद्याला पावसाळा आवडेलच असं नाही. पावसाळ्यात कोण भटकणार? चिखलानं कोण माखून घेणार? सर्दी-पडसं झालं तर? छ्या...नकोच ते. साधं दुखणंही तापावर जाईल, अंथरुणाला खिळून राहावं लागेल, करायला जायचो मजा, पण होईल सजा! त्यापेक्षा गपगुमान घरातच पडून राहावं झालं. अशा प्रकारचे विचार असलेले मनानं एकतर दुबळे असावेत किंवा महाआळशी तरी. हृदयविकार किंवा मधुमेह असलेली मंडळी तर आरोग्याच्या काळजीमुळं पावसात भटकण्याचं टाळतात. आपण आयुष्यातल्या एका अत्यंत चांगल्या आनंदाला मुकतो आहोत, याचा त्यांना विसर पडलेला असतो, किंवा बुद्ध्याच ते विसरल्याचा आव आणतात.

शारीरिक व्याधी असलेल्यांनी आयुष्य उपभोगू नये, असं काही कुठं लिहिलेलं नाही. कुठंही जाऊ नका, घरातच पडून राहा, असं डॉक्टरही सांगतील असं वाटत नाही. घरात राहून इतरांना पिडण्यापेक्षा बाहेर जाऊन निसर्गाच्या विशालतेत सामावून जाण्यातच शहाणपणा असतो.


साधारणपणे सहा वर्षांपूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली आहे. जोडीला मधुमेह आहेच. डॉक्टरांनी सांगितलेली तथ्यं आणि पथ्य मी पाळण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा ती पाळली जात नाहीत. परंतु, त्याचा बागुलबुवा न करता, मला वाटेल ते मी करत राहतो. अर्थात, आडवळणात धोका असतोच, पण त्याचाही मी कधी अतिरेक करत नाही. आता वयाच्या चौसष्टाव्या वर्षीही मी मनसोक्त भटकतो, सलग साताठशे किलोमीटरचं ड्रायव्हिंग करतो, दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत दुर्गम गड-कोट-किल्ले सर करत होतो. आता मात्र त्याचं प्रमाण खूपच कमी झालंय. पण भटकण्याची जन्मजात खोड काही केल्या सुटत नाही, किंबहुना तो सोडवण्याचा मुद्दाम प्रयत्नही करत नाही.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आम्ही कोयनानगरची सहल काढली. निवृत्तीनंतरही माझ्या कार्यालयातील समविचारी तरुण सहकाऱ्यांशी अद्याप माझे स्नेहाचे संबंध आहेत. ऋणानुबंधाच्या गाठीच त्या. सोडवू म्हणता सोडता येत नाहीत. वन्य पशू-पक्षी हे माझे खरे सगे-सोयरे आहेत. वन्य पशू-पक्षी निरीक्षण हा माझा जुनाच छंद. निवृत्तीनंतर तर मी तो अधिक जोमानं जोपासलाय. डोंगरमाथ्यावरून सखल भागाकडे वाहणारा ओढा जितका अवखळ, तितकाच माझा हा छंदही अवखळ झालाय. बंधमुक्त झालाय. हाताशी भरपूर वेळ असल्यानं, कुठं जाऊ आणि कुठं नको, असं कधीकधी होतं. मनात येईल तेव्हा पठडी भरावी, कॅमेऱ्याची बॅग पाठीवर टाकावी आणि निघावं, असा माझा खाक्या. कोयनानगर हा अनेक आवडत्या ठिकाणांपैकी एक. पावसाळ्यात या परिसरात एक तरी चक्कर होतेच होते.

कोयनानगर परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं. अर्थात त्यातली बरीच अनाम. अप्रसिद्ध असल्यामुळं त्यांना कोणी नावंच दिलेली नाहीत. कोणत्याही कड्यावर उभं राहावं आणि दरीकडे नजर टाकावी किंवा उंच शिखराकडे पाहावं, चरांचरात चैतन्य असल्याचं नक्कीच जाणवेल. नाव असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे नवजा धबधबा. नवजा गावाजवळचा म्हणून हे नाव पडलंय. जगप्रसिद्ध कोयना धरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीतून जाणारा रस्ताच नवजा धबधब्यापर्यंत नेऊन पोचवतो.

कोयऩेच्या पाण्यावर जी वीज तयार होते, ती सह्याद्रीच्या पायथ्याशी कोकणात असलेल्या पोफळी गावात. वीज कंपनीचा तिथं डोंगराच्या पोटात अवाढव्य प्रकल्प उभारलाय. हा प्रकल्प इतका भव्य आणि अत्याधुनिक आहे, की पाहणारा थक्क व्हायचंही विसरून जातो. नवजापर्यंत पोचवणारा धबधबा खरं तर वीज कंपनीच्या खासगी वापराचा. इतरांना या वाटेनं सहसा जाता येत नाही. कोयनानगरपासून सुमारे दहा-पंधरा किलोमीटरपर्यंत मात्र जाण्याची परवानगी आहे. नवजा धबधबा रस्त्यावरूनही दिसतो. जवळ भासणारा हा धबधबा प्रत्यक्षात एक-दीड किलोमीटरवर आहे. धबधब्यापर्यंत जायची वाट मात्र उंच-सखल आणि नागमोडी वळणांची. खूप वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असलेली पायवाट आणि राजमार्ग म्हणावा इतकी मोठी झालीय. वनखात्यानं काहीशी अवघड असणारी वाट आता बरीच सवघड केली असली, तरी दमछाक करणारी आहे. हृदयविकार असणाऱ्यांची इथं चांगलीच स्ट्रेस टेस्ट होते, ही जमेची बाजू. निसरड्या असलेल्या वाटाही आता चांगल्या केल्या आहेत आणि खडकांत पायऱ्याही खोदण्यात आल्या आहेत. डाव्या हाताला ओढ्याच्या रुपात खळाळत जाणारं धबधब्याचं पाणी सतत सोबत करतं. इतरही काही नाले वाटेत आडवे येतात.

या वाटेनं जाणाऱ्यांना प्रत्यक्ष धबधब्याखाली जाऊन आंघोळ करण्याचा आनंद घेता येत नाही. ही जी वाट आहे, ती धबधब्यासमोरच्या डोंगरावर नेऊन सोडते. तिथून डोंगर चढून गेल्यास, धबधब्याच्या माथ्यावर जाता येणं शक्य असलं, तरी ती वाट भलतीच धोकादायक आणि शरीराचा कस पाहणारी आहे. धबधब्याखाली पोचण्यासाठी ओढ्यातूनच वाटचाल करावी लागते. पावसाळ्यात तर ते अशक्य असतं. हा प्रदेश मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध. ओढ्यातून वाटचाल करताना अचानक पावसाची मोठी सर आल्यास धबधब्याचं पाणी वाढतं आणि ओढ्यातून जाणाऱ्यांच्या त्रेधा उडते. पावसाळ्यात या वाटेला न लागण्यातच शहाणपणा असतो. तरीही या वाटेनं जाणारी मंडळी असतातच. तरुणांनी तसा प्रयत्न करावा, इतरांनी मात्र दुरुनच धबधबा साजरा करावा, हे चांगलं.

धबधबा खूप उंचावरून पडत नसला, तरी पडणाऱ्या पाण्याचा वेग आणि आवेग मोठा आहे. रस्त्यावरून जातानाही त्याचा घनगंभीर आवाज ऐकू येतो. या धबधब्याखाली एक वीज निर्मिती केंद्र उभारण्याची वीज कंपनीची योजना होती. मात्र, तिला मूर्त स्वरूप येऊ शकलं नाही.

कोयना परिसर आता व्याघ्र प्रकल्प होऊ घातलाय. पूर्वी जिथं जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधनं नव्हती, तिथं आता परवानगीशिवाय जाताच येत नाही. अशी परवानगी मिळाली नाही, तरी हरकत नाही. जिथपर्यंत जाता येणं शक्य आहे, तिथपर्यंत गेलं, तरी सह्याद्रीतील जंगलांची साधारण कल्पना येऊ शकते. इथला पाऊस मुसळधार आणि पावसाचे थेंब इतके टपोरे, की अर्ध्या तासात ओढे-नाले दुथडी भरून वाहायला लागतात. पाण्याच्या या मुबलकतेमुळेच इथला निसर्ग अधिक देखणा आणि सदाहरित जंगलांसारखा हिरवाकंच भासतो.

धरण प्रकल्पाचं इथं गेस्ट हाऊस आहे. आधी बुकिंग करून तिथं राहता येतं. तिथल्या खानसाम्याच्या हाताला खास चव आहे. त्यानं काहीही केलं, तरी ते चांगलंच लागतं. आपण काय जेवणार आणि कधी, त्याची मात्र आधीच वर्दी द्यावी लागते. कोयना अभयारण्य अद्याप ताडोबा किंवा विदर्भातल्या इतर जंगलांसारखं नियोजनबद्ध झालेलं नाही. तरी इथं फिरण्याचा आनंद काही औरच असतो. पावसाळ्यात या परिसराला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण

विहंगभूमी नैनिताल

अशाच एका 'रम्य' सकाळी...